सौरऊर्जा व रेन वॉटर हार्वेस्टिंग करणाऱ्यांना घरफाळ्यात सवलत द्यावी – उमाकांत दाभोळे
इचलकरंजी :
शहरात पर्यावरणपूरक उपक्रमांना चालना देण्यासाठी इमारती व घरांवर सौरऊर्जा प्रकल्प (सोलर पॅनेल) तसेच रेन वॉटर हार्वेस्टिंग व्यवस्था राबविणाऱ्या मिळकतधारकांना घरफाळ्यात सवलत देण्याची योजना पुन्हा सुरू करावी, अशी मागणी भाजपचे उपाध्यक्ष उमाकांत दाभोळे यांनी इचलकरंजी महानगरपालिकेकडे केली आहे. याबाबत उपमहापौर तसेच महापालिका प्रशासनाकडे निवेदन देण्यात आले आहे.
दाभोळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, इचलकरंजी शहरात वाढती लोकसंख्या, औद्योगिक विकास आणि बदलते हवामान यामुळे पाणीटंचाई तसेच ऊर्जेची वाढती गरज हा गंभीर विषय बनत आहे. या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक आणि शाश्वत उपाययोजना राबविणे अत्यंत आवश्यक झाले आहे.
यापूर्वी नगरपालिकेच्या काळात रेन वॉटर हार्वेस्टिंग करणाऱ्या मिळकतधारकांना घरफाळ्यामध्ये सवलत देण्याची योजना राबविण्यात येत होती. या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये पाणी संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण झाली होती. मात्र महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर ही योजना प्रभावीपणे राबवली जात नसल्याचे दिसून येत आहे.
त्याचप्रमाणे सौरऊर्जा प्रकल्प हा पर्यावरणपूरक व भविष्यासाठी अत्यंत उपयुक्त ऊर्जा स्त्रोत ठरत आहे. अनेक नागरिक आपल्या घरांच्या छतावर सोलर पॅनेल बसवून वीज निर्मिती करत आहेत. यामुळे स्वच्छ व नवीकरणीय ऊर्जेचा वापर वाढण्यास मदत होते. तसेच नागरिकांच्या वीज बिलामध्ये बचत होऊन पारंपरिक ऊर्जास्रोतांवरील अवलंबित्व कमी होण्यासही मदत होते.
रेन वॉटर हार्वेस्टिंगमुळे पावसाचे पाणी साठवून ते जमिनीत मुरवता येते. त्यामुळे भूजल पातळी सुधारण्यास मदत होऊन भविष्यातील पाणीटंचाई कमी करण्यास हातभार लागतो. तसेच पावसाळ्यातील पाणी साचण्याचे प्रमाण कमी होऊन शहरातील जलव्यवस्थापन सुधारण्यास मदत होते.
या सर्व बाबींचा विचार करून ज्या मिळकतधारकांनी आपल्या इमारती किंवा घरांवर सौरऊर्जा प्रकल्प व रेन वॉटर हार्वेस्टिंग व्यवस्था बसविली आहे किंवा बसविणार आहेत, त्यांना प्रोत्साहन म्हणून घरफाळ्यामध्ये सवलत देण्याची योजना इचलकरंजी महानगरपालिकेने पुन्हा सुरू करावी, अशी मागणी उमाकांत दाभोळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. यामुळे नागरिकांमध्ये पर्यावरणपूरक उपक्रमांना प्रोत्साहन मिळून शहराच्या शाश्वत विकासाला चालना मिळेल, असेही त्यांनी नमूद केले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







