खा.डॉ. मेधा कुलकर्णी व विवेक देशपांडे यांना श्रीमंत घोरपडे सरकार पुरस्कार जाहीर
इचलकरंजी :
श्री शिष्यसंवर्धिनी प्रतिष्ठान संचलित श्रीमंत घोरपडे सरकार पुरस्कार समिती, इचलकरंजी यांच्या वतीने यंदाचे प्रतिष्ठेचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यंदाचा ‘श्रीमंत अनुबाई घोरपडे सरकार पुरस्कार’ राज्यसभेच्या सदस्या प्रा. डॉ. मेधा विश्राम कुलकर्णी यांना तर ‘श्रीमंत नारायणराव घोरपडे सरकार पुरस्कार’ उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते विवेक शंकरराव देशपांडे यांना प्रदान करण्यात येणार आहे.
हा पुरस्कार सोहळा शनिवार, दि. २१ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता इचलकरंजी येथील फॉर्च्यून बँक्वेट हॉल, फॉर्च्यून प्लाझा येथे आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत यशवंतराव गोविंदराव घोरपडे सरकार (अधिपती, इचलकरंजी) असणार आहेत.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी पोलीस महासंचालक प्रवीण नारायण दीक्षित (IPS, Retd. DGP Maharashtra) उपस्थित राहणार आहेत. तसेच सन्माननीय उपस्थिती म्हणून माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश अण्णा आवाडे, माजी आमदार सुरेशराव हाळवणकर, आमदार डॉ. राहुल आवाडे, इचलकरंजी महानगरपालिकेचे महापौर उदय धातुंडे व उपमहापौर अनिल डाळ्या उपस्थित राहणार आहेत.
राज्यसभेच्या सदस्या डॉ. मेधा कुलकर्णी या महाराष्ट्रातील ज्येष्ठ राजकीय व सामाजिक कार्यकर्त्या असून पुणे शहरातील राजकारणात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. त्यांनी पुणे महानगरपालिकेत नगरसेविका म्हणून सार्वजनिक जीवनाची सुरुवात केली. त्यानंतर २०१४ ते २०१९ या कालावधीत कोथरूड मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेच्या आमदार म्हणून काम केले असून सध्या त्या राज्यसभेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत आहेत.
तर विवेक शंकरराव देशपांडे हे उद्योग, सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेले बहुआयामी व्यक्तिमत्त्व मानले जाते. रुद्राणी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी पायाभूत सुविधा क्षेत्रात विविध प्रकल्प राबवून विकास प्रक्रियेत योगदान दिले आहे. सामाजिक व संघटनात्मक उपक्रमांमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.
या पुरस्कार सोहळ्यास समाजातील मान्यवर व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.यावेळी शिक्षसंवर्धनी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा रमा फाटक,नरोत्तम लाटा,मोहन माने,रवी जावळे, प्रथमेश इंदुलकर उपस्थित होते.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








