इचलकरंजीत बॅटरी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तीन आरोपी अटकेत, १.३३ लाखांचा मुद्देमाल जप्त
इचलकरंजी :
शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने बॅटरी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्या कडून एकूण १ लाख ३३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जुना वैरण बाजार परिसरात १ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७.०० वाजता ट्रक पार्क करून मालक घरी गेले होते. त्यानंतर २ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता ट्रकजवळ आल्यावर ट्रकच्या बॅटऱ्या चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. यामध्ये एक्साईड व अॅमरॉन कंपनीच्या १२० ते १३० अॅम्पिअर क्षमतेच्या तीन बॅटऱ्या, अंदाजे ४५ हजार रुपयांचा माल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला होता. याप्रकरणी विठ्ठल बलराम काकणके (रा. पुजारी मळा, जुना चंदूर रोड, इचलकरंजी) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
दरम्यान, नोव्हेंबर २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत मालवाहतूक वाहनांच्या बॅटरी चोरीचे अनेक प्रकार घडले होते. या गुन्ह्यांचा तपास गुन्हे शोध पथक करत असताना पोलीस अंमलदार सद्दाम सनदी यांना गोपनीय माहिती मिळाली. त्या आधारे पोलिसांनी विकास शरद जिरगे (वय २०), शिवम भरत झेंडे (वय २०) व प्रतीक राजू कांबळे (वय १९, सर्व रा. कोल्हापूर नाका परिसर, इचलकरंजी) यांना ताब्यात घेतले.
तपासादरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्या कडून मालवाहतूक वाहनांच्या विविध कंपन्यांच्या १३ बॅटऱ्या (किंमत १,०३,५०० रुपये) तसेच चोरीसाठी वापरलेली मोटारसायकल (किंमत ३०,००० रुपये) असा एकूण १,३३,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तपासात या आरोपींकडून शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील बॅटरी चोरीचे पाच गुन्हे उघडकीस आले असून आरोपींना अटक करण्यात आली आहे व पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक डॉ. धीरजकुमार बच्चू आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड, उपनिरीक्षक प्रविण साने तसेच गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदारांनी केली. याबाबतची माहिती अपर पोलीस अधीक्षक धीरजकुमार बच्चू यांनी दिली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड व शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी शिवाजी गायकवाड उपस्थित होते.
आरोपींसह अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू,विक्रांत गायकवाड,शिवाजीराव गायकवाड व इतर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







