इचलकरंजीत मूक पदयात्रेने छत्रपती संभाजी महाराज बलिदान मासची सांगता
इचलकरंजी :
येथील श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेतर्फे बुधवारी मूक पदयात्रा काढून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मासाची सांगता करण्यात आली. ही पदयात्रा शहरातील मंगलधाम जवळील गणेश मंदिर येथून सुरू होऊन प्रमुख मार्गांवरून नेण्यात आली. यामध्ये हजारो युवक व युवती उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
शहरात गेल्या २३ वर्षांपासून श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास पाळला जात आहे. यानिमित्त महिनाभर शहरातील ३०० हून अधिक ठिकाणी महाराजांच्या पराक्रमाच्या गाथा व प्रार्थना आयोजित करण्यात आल्या होत्या. या कालावधीत अनेक युवक-युवतींनी आपल्या आवडत्या पदार्थांचा त्याग करून सहभाग नोंदविला.
बुधवारी वढूबुद्रुक येथून आणलेल्या ज्वालेचे पूजन तसेच छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयुक्त पल्लवी पाटील, नगरसेवक रवींद्र माने, नगरसेविका रूपा बुगड, माजी नगरसेवक सागर चाळके, पैलवान अमृतमामा भोसले, मधुकर मुसळे, दीपक पाटील आदी उपस्थित होते.
यानंतर प्रेरणा मंत्राने मूक पदयात्रेस प्रारंभ झाला. पदयात्रेच्या अग्रभागी ज्योत व भगवा ध्वज तर त्यामागे शस्त्र पथक सहभागी होते. ही पदयात्रा महात्मा गांधी चौक, झेंडा चौक, श्रीमंत घोरपडे नाट्यगृह चौक, चांदणी चौक, छत्रपती संभाजी महाराज चौक, शिवतीर्थ मार्गे कॉ. मलाबादे चौक येथील श्री शंभूतीर्थ येथे संपन्न झाली.
यावेळी पन्हाळ्याचे धारकरी सुरज पाटील यांनी शिवशंभूंच्या कार्याची महती सांगितली. त्यानंतर मंत्राग्नी देऊन ज्वालेचे अग्निकुंडात विसर्जन करण्यात आले. उपस्थित धारकऱ्यांनी कुंडाचे दर्शन घेतले. छत्रपती संभाजी सूर्यहृदय व ध्येयमंत्र घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
या मूक पदयात्रेत कार्यवाह प्रसाद जाधव, मंगेश मस्कर, सुरज इंगळे, सोमनाथ काशीद, ॲड. समीर मुदगल, सुशांत घोरपडे, अभी शेळके, श्रीकांत पोवार, नंदकिशोर नाईक, बापू पोवार, दीपक कुंभार यांच्यासह महिला, बालक व तरुण धारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
बलिदान मास समारोप प्रसंगी जमलेला जनसमुदाय
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







