ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजी महानगरपालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिलासा; १८ मार्चपासून प्रलंबित देयकांचे वितरण सुरू – उमाकांत दाभोळे

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजी महानगरपालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिलासा; १८ मार्चपासून प्रलंबित देयकांचे वितरण सुरू  उमाकांत दाभोळे

इचलकरंजी :
इचलकरंजी महानगरपालिकेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेत प्रशासनाने प्रलंबित देयकांच्या वितरणाला १८ मार्च २०२६ पासून प्रत्यक्ष सुरुवात केली आहे. सुमारे १७० ते १७५ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची मिळून तब्बल १० कोटी रुपयांहून अधिक रकमेची देणी टप्प्याटप्प्याने अदा करण्यात येणार असल्याची घोषणा महापौर उदय धातुंडे यांनी केली होती. त्यानुसार आज पहिल्या टप्प्यात ५ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सुमारे २० लाख रुपयांहून अधिक रकमेचे धनादेश वितरित करण्यात आले.
या संदर्भात महापौर उदय धातुंडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे, तसेच कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली होती. या बैठकीत सखोल चर्चा करून प्रलंबित देयके टप्प्याटप्प्याने देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याची अंमलबजावणी आता प्रत्यक्षात सुरू झाली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून निवृत्तीनंतर मिळणाऱ्या आर्थिक लाभांच्या प्रतीक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. अनेकांना वैद्यकीय, कौटुंबिक व दैनंदिन गरजांसाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतल्याने हा प्रश्न मार्गी लागल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष उमाकांत दाभोळे यांनी या विषयावर सातत्याने पाठपुरावा करत प्रशासनाचे लक्ष वेधले होते. निवेदनांद्वारे व विविध स्तरांवर आवाज उठवत त्यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे हक्काचे लाभ तात्काळ देण्याची मागणी केली होती. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून प्रशासनाने त्यानुसार निर्णय घेतला आहे.
महापौर, उपमहापौर, नगरसेवक, विरोधी पक्षनेते तसेच सर्व कर्मचारी संघटनांचे सहकार्य या निर्णयात लाभले आहे. प्रशासनाने दिलेला शब्द पाळत देयकांचे वितरण सुरू केल्याने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
आगामी काही दिवसांत उर्वरित सर्व पात्र कर्मचाऱ्यांची देणी पूर्णपणे अदा करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले असून, या निर्णयामुळे महानगरपालिकेच्या व महापौर यांच्या कामकाजाविषयी सकारात्मक संदेश नागरिकांमध्ये पसरत आहे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा