कामगार नेते शामराव कुलकर्णी
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी
(९८५०८ ३०२९० )
इचलकरंजीचे ज्येष्ठ कामगार नेते आणि माझे ज्येष्ठ सन्मित्र शामराव श्रीपाद कुलकर्णी हे रविवार ता.२२ मार्च २०२६ रोजी कालवश झाले. वयाच्या ७८ व्या वर्षीही शामराव प्रकृतीने धडधाकट होते. पण अचानक त्यांना थोडा त्रास होऊ लागला. डॉक्टरांनी तपासणी केली असता त्यांची बायपास सर्जरी करणे गरजेचे आहे असे आढळून आले. त्यानुसार मिरजेला सेवासदनला त्यांची दहा दिवसांपूर्वी बायपासही झालेली होती. रविवार ता.१५ मार्च २०२६ रोजी मिरजेला सेवासदन मध्ये मी आणि माझे वर्गमित्र व शामरावांचे चुलत बंधू ऍड .सुनील कुलकर्णी , संजय फडणीस त्यांना भेटूनही आलेलो होतो. त्यावेळी आयसीयू मध्येही शामरावानी त्यांच्या निधड्या स्वभावाप्रमाणे सकारात्मकता दाखवत दोन-चार दिवसात इचलकरंजी परत येईन आणि पूर्ववत कामाला लागेन असे सांगितले होते.
त्यांनी त्या भेटीत पूर्णवेळ माझा हात हातात धरला होता. काही वेळा तो तसाच डोक्यापर्यंतही नेत होते. परत येतांना मला संजय फडणीस म्हणालेही, शामरावांचे तुमचे संबंध फार जिव्हाळ्याचे आहेत हे या आयसियूतील भेटीत दिसून आले.साडेतीन-चार तासाची हृदयाची अवघड शस्त्रक्रिया दोन दिवसापूर्वी त्यांच्यावर झाली असावी असे वाटत नव्हते. उपचार सुरू असल्याने नाकातील नळ्या व इतर सर्व औषधोपचार सुरू होते. पण त्यातूनही शामरावांचा झोकदार मिश्यांचा उत्साही चेहरा झाकोळू शकत नव्हता.त्यांना हॉस्पिटलमध्ये आम्ही बघायला आल्याचा फार आनंद झाला होता. तो त्यांनी बोलूनही दाखवला होता. शामरावांचे चिरंजीवही डॉक्टर आहेत.त्यांनीही तेंव्हा आठ-दहा दिवसाच्या विश्रांतीनंतर डिस्चार्ज मिळेल असे सांगितले होते. मलाही शामराव धडधाकट होवून परततील असे खात्रीने वाटत होते.आणि अचानक शामराव गेल्याची धक्कादायक बातमी रविवारी आली. आणि पुनर्भेट होणारच या खात्रीने झालेली गेल्या रविवारची ती सेवासदन मधील भेट अखेरचीच ठरली.
शामराव आणि माझ्या वयात जवळ जवळ दोन दशकांचे अंतर होते.पण ते अंतर त्यांनी कधी जाणवून दिले नाही. ते सतत बरोबरीच्या नात्याने किंवा प्रसंगी मलाच मोठेपणा देत बोलायचे. त्यांच्या बोलण्यात एक मिश्किलता होती. शामराव अनेकदा समाजवादी प्रबोधिनीत आवर्जून भेटायला येत असत.त्यात अनोपचारिक चर्चा तर असायचीच. पण एखादया विषयाची सर्वांकषपणे चर्चा करावी अशीही त्यांची भूमिका असायची.अनेक सार्वजनिक कार्यक्रमातही त्यांची भेट होत असे. त्यावेळी त्यांचे मार्मिक, हजरजबाबी बोलणे अनुभवायला मिळे.
शामराव कुलकर्णी इचलकरंजी व परिसराच्या राजकारण , समाजकारण, सहकार अशा अनेक क्षेत्रांचा गेल्या शतकभरचा अभ्यास असणारे एक व्यक्तिमत्व होते. ते स्वतः तीक्ष्ण स्मरणशक्तीचा एक संदर्भकोश होते.गेल्या अर्धशतकातील सर्व नेते मंडळींशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. तसेच गेल्या काही दशकातील अनेक घडामोडींचे संदर्भ त्यांना अचूक माहीत होते. त्यांच्या बोलण्यातून ते जाणवायचे. शामरावांना लेखनाचीही आवड होती. ते लेखक आणि संपादकही होते.ते अनेकदा प्रासंगिक लेखन करत. ज्येष्ठ मंडळींच्या जयंती व मयंती निमित्त ते हमखास त्यांचे व्यक्तित्व आणि कर्तृत्व लेखणीतून मांडत असत.तसेच अनेक राज्य व राष्ट्रीय घडामोडींवरही ते सातत्याने वृत्तपत्रीय लेखन करत असत. काही वेळा ते आवर्जून फोन करून प्रकाशित झालेला लेख वाचून अभिप्राय कळवायला सांगत. हा ही एक त्यांचा विशेष स्वभावगुण होता.
शामरावांचा लोकसंपर्क मोठा होता. कामगार नेते असले तरी त्यांचा समाजातील सर्व स्तरात संपर्क होता. शामरावानाही इचलकरंजी आणि परिसरातील बहुतेक सर्वजण ओळखत होते. शामरावांकडे उत्तम वक्तृत्वशैली होती. त्या वक्तृत्वात लोकांना खिळवून ठेवण्याची ताकद होती. तितकीच आक्रमकताही होती .कामगार आंदोलनांपासून निवडणुकांच्या प्रचारसभेपर्यंत त्यांची ही झलक दिसून येत असे. राजकीय विरोधक अंगावर आले तर शिंगावर घेण्याची त्यांची शैली होती. त्या अर्थाने शामराव हे एक निडर नेते होते.
इचलकरंजी ही वस्त्रोद्योगनगरी. या वस्त्रोद्योग नगरीत कामगार नेते म्हणून शामरावांनी चार दशकांहून अधिक काळ काम केले.कामगार चळवळीत विशेषतः कापड प्रक्रिया उद्योगात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. प्रोसेसच्या कामगारांची त्यांनी उत्तम संघटना बांधलेली होती. या कामगारांना किमान वेतन, बोनस वगैरे मूलभूत हक्क मिळवून देण्यात त्यांचे योगदान मोठे होते.
इचलकरंजी शहर काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केले. नगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक म्हणूनही त्यांना काम करण्याची संधी मिळाली. तेथेही कार्यकर्त्याचा पिंड असलेल्या या नेत्याने स्वतःचा ठसा उमटवला. इचलकरंजीतील सर्वपक्षीय संयुक्त कामगार चळवळीच्या माध्यमातून त्यांनी कामगारांनी कष्टकऱ्यांच्या लढ्यामध्ये बहुमोल योगदान दिले होते. अशा या ज्येष्ठ सन्मित्र असलेल्या जेष्ठ कामगार नेत्याला विनम्र अभिवादन…!
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







