आयजीएम मध्ये क्षयरोग दिन साजरा
इचलकरंजी :
एकत्र येवूया टीबी हरवूया या घोषवाक्यांतर्गत इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयात जागतिक क्षयरोग दिन साजरा करण्यात आला. क्षयरोगाविषयी जनजागृती निर्माण करणे, वेळेवर निदान व उपचाराचे महत्त्व पटवून देणे हा कार्यक्रमाचा उद्देश होता.
कार्यक्रमाची सुरुवात क्षयरोगाचा जीवाणू शोधणारे शास्त्रज्ञ डॉ. रॉबर्ट कॉक यांच्या प्रतिमेच्या पूजनाने व दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. संतोष पोळ यांनी होय आपण क्षयरोग संपवू शकतो या जागतिक संकल्पनेचा उल्लेख करत टीबी मुक्त भारत अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती दिली. तसेच १०० दिवसांच्या विशेष मोहिमेत इचलकरंजी शहरातील उच्च जोखमीच्या भागांमध्ये शंभर टक्के सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. यामध्ये रुग्णांची एक्स-रे, स्पुटम व सीबी-नॅट तपासणी, तसेच १४ वर्षांखालील संशयित मुलांची तपासणी करून उपचार करण्यात आले. आशा वर्कर, आरोग्य सेवक आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून व्यापक जनजागृतीही करण्यात आली असल्याचे सांगितले.
क्षयरोग चिकित्सक डॉ. मानसी कदम यांनी क्षयरोग दिनाचा इतिहास, त्याचे महत्त्व आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमास निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित सोहनी, शरीर विकृती शास्त्रज्ञ डॉ. प्रकाश मोरे, एआरटी विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. खारगे आदींसह वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, परिचारिका, रुग्ण व नातेवाईक उपस्थित होते. सूत्रसंचालन अक्षय मोरे तर महेश पाटोळे यांनी आभार मानले.
क्षयरोग दिन कार्यक्रमात बोलताना डॉ संतोष पोळ व इतर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







