महानगरपालिका शाळा क्र. ३३ ची उपमहापौर शिक्षण समिती सभापतींकडून पाहणी; शैक्षणिक दर्जा उंचावण्याचे निर्देश
इचलकरंजी:
इचलकरंजी महानगरपालिका शाळा क्रमांक ३३ (भारत माता विद्या मंदिर) येथे उपमहापौर व शिक्षण सभापती यांनी अचानक भेट देत शालेय कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी वर्गांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षकांना शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्याचे निर्देश दिले.
पाहणीदरम्यान शासनाकडून प्राप्त पाठ्यपुस्तके व शैक्षणिक साहित्याचे वितरण तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच शाळेत ‘बोलक्या भिंती’ तयार करणे, अभ्यासक्रम नियोजनाचे फलक लावणे आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीकडे वैयक्तिक लक्ष देऊन अध्यापन अधिक प्रभावी करण्याचे मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी उपमहापौर व शिक्षण सभापती म्हणाले की, महानगरपालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना दर्जेदार व आधुनिक शिक्षण मिळणे हा त्यांचा हक्क आहे. ‘डिजिटल क्लासरूम’ तत्काळ कार्यान्वित करून संगणक शिक्षणावर भर द्यावा, तसेच स्पर्धा परीक्षांसाठी विशेष शिष्यवृत्ती वर्गांचे नियोजन करावे. विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवण्यासाठी पालकांशी नियमित संपर्क ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
महानगरपालिका शाळा खासगी शाळांच्या तोडीच्या करण्याचा प्रशासनाचा मानस असून कामात कसूर करणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही देण्यात आला. या भेटीमुळे शाळेतील प्रशासकीय शिस्त सुधारून शैक्षणिक दर्जा उंचावेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
शाळेची पाहणी करताना उपमहापौर अनिल डाळ्या,शिक्षण समिती सभापती विद्या साळुंखे
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







