ICHMH51NEWS.IN
9921600800

पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर उदयसिंग पाटील यांची मजरेवाडी जॅकवेलला पाहणी; प्रशासनावर तीव्र टीका,पाणीप्रश्नी जनजागृती करून मोर्चा काढण्याची घोषणा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर उदयसिंग पाटील यांची मजरेवाडी जॅकवेलला पाहणी; प्रशासनावर तीव्र टीका,पाणीप्रश्नी जनजागृती करून मोर्चा काढण्याची घोषणा

इचलकरंजी : 

शहरात निर्माण झालेल्या तीव्र पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते श्री. उदयसिंग पाटील यांनी मजरेवाडी येथील पाणी उपसा जॅकवेलला अचानक भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. सध्या नागरिकांना ७ ते ८ दिवसांतून एकदाच पाणीपुरवठा होत असल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे.

पाहणीदरम्यान जॅकवेलवर ५४० एचपी क्षमतेचे चार पंप असतानाही त्यापैकी केवळ एकच पंप सुरू असून तोही सुमारे ७० टक्के क्षमतेने कार्यरत असल्याचे आढळून आले. तसेच १६०० केव्हीए क्षमतेचे दोन ट्रान्सफॉर्मर असून त्यापैकी एकच कार्यरत असून दुसरा बंद अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले. मजरेवाडी ते इचलकरंजी दरम्यान एअरव्हॉल्व पूर्णपणे बदलण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, दोन पूर्ण क्षमतेचे पंप सुरू केल्यास शहराला दररोज पाणीपुरवठा होऊ शकतो, तसेच कृष्णा नदीत पुरेसे पाणी उपलब्ध असून यंत्रणाही सक्षम असल्याचे पाटील यांनी सांगितले. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावे लागत असल्याचा आरोप त्यांनी केला.

इचलकरंजीतील पाणी प्रश्न हा मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये कळीचा मुद्दा ठरला होता. तरीही सध्याचे आमदार व खासदार या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत नसल्याची टीकाही त्यांनी केली. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि प्रशासनावर प्रभावी नियंत्रण नसल्यामुळे ही समस्या अधिक गंभीर होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सध्या जुन्या पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा सुरू असून नवीन पाइपलाइन मजरेवाडी उपसा केंद्रापर्यंत टाकण्यात आली आहे. मात्र सुमारे अर्धा किलोमीटर पाइपलाइन तातडीने बदलणे आवश्यक असून ही जोडणी पूर्ण झाल्यास नियमित पाणीपुरवठा शक्य होईल, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, पाणी टंचाईच्या प्रश्नावर दि. ५ मार्च २०२६ रोजी महापौरांकडे विशेष सभेची मागणी करण्यात आली असून कायदेशीर पत्रव्यवहारही केला आहे. तरीही महापौरांकडून विशेष सभा घेतली जात नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.

पाणीपुरवठा नियमित न झाल्यास शिवशाहू विकास आघाडीच्या वतीने सभागृहात तसेच रस्त्यावर आंदोलन छेडण्यात येईल, तसेच जनजागृती मोहीम व मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा