ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत सुतातील भेसळप्रकरणी केंद्रीय वस्त्रोद्योग विभागाची धडक बैठक; कठोर कारवाईचे संकेत

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत सुतातील भेसळप्रकरणी केंद्रीय वस्त्रोद्योग विभागाची धडक बैठक; कठोर कारवाईचे संकेत

इचलकरंजी :
 शहरात विकल्या जाणाऱ्या सुतामध्ये भेसळ होत असल्याच्या तक्रारीनंतर अखेर केंद्रीय वस्त्रोद्योग विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. याबाबत इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनने केंद्रीय वस्त्रोद्योग आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्यानुसार गुरुवारी प्रादेशिक वस्त्रोद्योग कार्यालयाचे डायरेक्टर सतीश कुमार सिंग यांच्या नेतृत्वाखाली संबंधित अधिकाऱ्यांनी शहरात येऊन विविध संघटनांसोबत बैठक घेतली.
प्रथम यार्न मर्चंट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा झाल्यानंतर इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनमध्ये पॉवरलुम, अडत व्यापारी, ट्रेडिंग व फॅब्रिक क्लॉथ ब्रोकर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत सुतातील भेसळीमुळे निर्माण झालेल्या गंभीर समस्यांचा आढावा घेण्यात आला.
असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सविस्तर माहिती देताना सांगितले की, काही सुत व्यापारी १०० टक्के कॉटन म्हणून विक्री करत असताना प्रत्यक्षात सुतामध्ये पॉलिस्टर, विस्कोस, लॉयॉझील व नायलॉन धाग्यांचे मिश्रण केले जात आहे. विशेषतः ४० काउंटच्या सुतामध्ये विस्कोस व पॉलिस्टर मिसळून ते ६० काउंट म्हणून विकले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे कापडाच्या गुणवत्तेवर परिणाम होऊन प्रोसेसिंगनंतर पट्टापट्टीसारखे दोष दिसून येत आहेत.
या भेसळीमुळे यंत्रमागधारक व व्यापाऱ्यांमध्ये वाद वाढत असून अडत व्यापाऱ्यांनी कापड खरेदी बंद करण्याचा इशाराही दिला आहे. लहान यंत्रमागधारकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले जात असून क्लेमही मंजूर होत नसल्याची नाराजी व्यक्त करण्यात आली.
बैठकीत सुत विक्री करताना गेटपास व बिलावर सुतातील मिश्रण व काउंटची स्पष्ट माहिती देणे बंधनकारक करावे, भेसळ आढळल्यास पूर्ण क्लेम व्यापाऱ्याने द्यावा व दोषी व्यापाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशा ठोस मागण्या करण्यात आल्या.
यावर प्रादेशिक वस्त्रोद्योग कार्यालयाचे डायरेक्टर सतीश कुमार सिंग यांनी या प्रकरणात कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. भविष्यात सुतातील मिश्रण व काउंटची अचूक माहिती देणे व्यापाऱ्यांना अनिवार्य केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीस विविध असोसिएशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पॉवरलूम असोसिएशनमधे झालेल्या बैठकीतले छायाचित्र
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा