सेवा भारतीतर्फे अत्याधुनिक वैद्यकीय केंद्राचा शुभारंभ; समाजोपयोगी कार्याला नवे बळ
इचलकरंजी :
शहरातील नागरिकांना दर्जेदार, परवडणारी व सर्वसमावेशक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सेवा भारती संस्थेतर्फे अत्याधुनिक वैद्यकीय निदान व दंतचिकित्सा केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. महात्मा गांधी पुतळ्यानजीक छाबडा हाइट्स येथे सुरू झालेल्या या केंद्राचे उद्घाटन रा. स्व. संघ पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक नानासाहेब जाधव यांच्या हस्ते, तर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
कार्यक्रमाची सुरुवात भारतमातेच्या पूजनाने व दीपप्रज्वलनाने झाली. प्रास्ताविक करताना श्रीकांत प्रभुदेसाई यांनी संस्थेच्या कार्याचा सविस्तर आढावा घेतला. सुरुवातीच्या काळात केवळ ३६५ रुपयांच्या ६०० पावत्यांद्वारे या उपक्रमाची पायाभरणी करण्यात आली असून आजपर्यंत शासनाचा एकही रुपया न घेता जनसहभागातून सेवा प्रकल्प उभे राहिले असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच किशोर जोशी यांनी जागा उपलब्ध करून दिल्यामुळे सर्व सोयींनी युक्त २४ तास सुरू असलेले रुग्णालय कार्यान्वित झाल्याचे सांगितले. फिरते रुग्णालयही कार्यरत असून ग्रामीण व गरजू भागांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवली जात आहे.
सेवा भारती संस्था गेल्या ३७ वर्षांपासून डॉ. हेडगेवार रुग्णालय, फिरता दवाखाना, माधव विद्यामंदिर व शिशू मंदिराच्या माध्यमातून आरोग्य व शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे. नव्या केंद्रामध्ये सोनोग्राफी, डिजिटल एक्स-रे, विविध रक्त तपासण्या तसेच आधुनिक दंतोपचार सेवा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. कुशल डॉक्टर्स व प्रशिक्षित तंत्रज्ञांच्या माध्यमातून अत्याधुनिक साधनसामग्रीसह सेवा देण्याचा संस्थेचा मानस आहे.
यावेळी अमोद कुलकर्णी यांनी संस्थेच्या कार्यपद्धतीत शिस्तबद्धता हीच संघाची ओळख असल्याचे सांगितले.
ना.चंद्रकांत दादा पाटील यांनी कोविड निदान, डायबेटीस याचे विवेचन करत स्तन कॅन्सरसाठी मॅमोग्राफी मशीन उभारण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली. ‘फाय’ ग्रुपने याबाबत तयारी दर्शवली
कार्यक्रमात ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी समाजोपयोगी कार्यासाठी सहकार्याची भूमिका स्पष्ट करत समाजातील दानशूर वृत्तीमुळे अशा उपक्रमांना चालना मिळत असल्याचे मत व्यक्त केले.
या प्रसंगी भगतराम छाबडा, असीम कुलकर्णी, मयूर लक्ष्मेश्वर उपस्थित होते यावेळी संस्थेस रामभाऊ राशीनकर, रामनिवासजी लाहोटी यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे नमूद करण्यात आले. व्यासपीठावर विभाग संघचालक अप्पासाहेब दड्डीकर, डॉ. एस. पी. मर्दा आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार अनिल गोयल यांनी मानले. या सोहळ्यास विश्वस्त, देणगीदार, नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हिंदू उद्योजकांना सीएसआर सक्तीची गरज नसते-ना.चंद्रकांतदादा पाटील
हिंदू नागरिक असो व उद्योजक हे दानशूर असतात, मंदिरातील दानपेटीच्या रक्कमेतून शाळा ,कॉलेज,दवाखाने,अन्नछत्र यासह विविध सामाजिक उपक्रम चालतात त्यामुळे हिंदू उद्योजकांना सीएसआर सक्तीची आवश्यकता नसल्याचे मत ना चंद्रकांतदादा पाटील यांनी मांडले.
कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना चंद्रकांत दादा पाटील व नानासाहेब जाधव
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800





