सुतातील भेसळीविरोधात कडक कारवाई; यंत्रमाग उद्योगाला दिलासा
इचलकरंजी :
इचलकरंजीतील यंत्रमाग उद्योगाला भेडसावणाऱ्या सुताच्या निकृष्ट दर्जा व भेसळीच्या समस्येची केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाने गंभीर दखल घेतली आहे. दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनने २ एप्रिल २०२६ रोजी केलेल्या तक्रारीनंतर वस्त्रोद्योग आयुक्तालयाचे संचालक सतीश कुमार सिंग यांनी अहवाल आयुक्त वृंदा मनोहर देसाई यांच्याकडे सादर केला आहे.
तपासणीदरम्यान सूतामध्ये विस्कोस व लायसेल फायबरची अघोषित मिसळ, चुकीचा यार्न काऊंट व फायबर कंपोझिशनमधील तफावत यामुळे ग्रे कापडात पट्टे व रंगातील फरक यांसारखे दोष निर्माण होत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे यंत्रमागधारकांना आर्थिक फटका बसून कापड खरेदीत घट झाल्याचेही निदर्शनास आले.
या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांच्या ठिकाणी नियमित व अचानक तपासण्या, नमुना चाचण्या आणि नोंदींची सक्ती करण्यात येणार आहे. भेसळ, चुकीचे लेबलिंग किंवा फसवणूक आढळल्यास भारतीय दंड संहितेनुसार कडक कारवाई केली जाणार आहे.
या निर्णयाचे स्वागत करताना असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या उपाययोजनांमुळे भेसळ रोखली जाऊन यंत्रमागधारकांना दर्जेदार सूत उपलब्ध होईल, असा विश्वास व्यक्त केला.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








