आपटे वाचन मंदिराची ५४ वी वसंत व्याख्यानमाला उत्साहात सुरू.
इचलकरंजी
दि. 03 मे 2026 रोजी आपटे वाचन मंदिराच्या ५४ व्या वसंत व्याख्यानमालेची सुरुवात पंढरपूर येथील एचआयव्ही ग्रस्त अनाथ बालकांचे संगोपन आणि पुनर्वसन करणाऱ्या पालवी संस्थेच्या संस्थापिका मा. मंगलाताई शहा यांच्या विशेष संवाद कार्यक्रमाने मोठ्या उत्साहात झाली. मंगलाताईंनी सुरू केलेल्या पालवी या संस्थेत एचआयव्हीग्रस्त अनाथ मुलांचे संगोपन कार्य आपल्या आईकडून करुणा आणि वाचन हे दोन संस्कार घेऊन सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. अशा अनाथ मुलांचे शिक्षण पूर्ण होण्यासाठी विनाअनुदानित शाळा सुरू केली आणि त्याचबरोबर मनो रुग्ण स्त्रिया व निराधार स्त्री- पुरुषांचे पुनर्वसनाचेही कार्य सुरू केले. या कामात सामाजिक अडचणी, अडथळे आणि अवहेलांचा सामना करावा लागल्याचे नमूद केले. अशा निराधार मुलांच्या आणि स्त्रियांच्या चेहऱ्यावरचा आनंद हाच सर्वात मोठा गौरव आहे असे भावनिक उद् गार काढले. त्याचबरोबर पालवीच्या जडणघडणीमध्ये पंडित काका कुलकर्णी व इचलकरंजीकरांचा मोठा वाटा आहे याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. पाहुण्यांचे स्वागत कार्यवाह प्रा. मोहन पुजारी यांनी केले व प्रास्ताविक उपाध्यक्ष काशिनाथ जगदाळे यांनी केले. मंगलाताईंची मुलाखत संस्थेचे संचालक श्री. संजय सातपुते यांनी मोठ्या उत्साहात घेतली. या कार्यक्रमात पालवी संस्थेची चित्रफित दाखवण्यात आली. या कार्यक्रमास ग्रंथालयाचे संचालक, प्रायोजक, मान्यवर व्यक्ती आणि मोठ्या संख्येने श्रोते उपस्थित होते.
मंगलाताई शहा विशेष संवाद प्रसंगी
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800



