पंचगंगेत पाणी न सोडण्याचा अटीवर आंदोलन अंकुशचे आंदोलन स्थगित.
इचलकरंजी :
पंचगंगा नदी प्रदूषण मुक्ती समितीची महत्त्वपूर्ण बैठक बुधवारी (दि. १३ मे) दुपारी १२ वाजता समिती अध्यक्ष तथा महापौर उदय धातुंडे यांच्या दालनात पार पडली. शहरातील प्रोसेस उद्योगाचे पाणी नदीत न सोडण्याच्या अटीवर आंदोलन तात्पुरते मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
प्रोसेसिंग असोसिएशनने २९ शेतकऱ्यांच्या सुमारे ७० एकर क्षेत्रामध्ये प्रक्रिया केलेले पाणी शेतीसाठी वापरण्यास उपलब्ध असल्याचे सांगत संबंधित शेतकऱ्यांची यादी, ७/१२ उतारे व हमीपत्र समितीकडे सादर केले. या कागदपत्रांची प्रत्यक्ष पडताळणी करण्यासाठी समिती सदस्य गुरुवार दि. १४ मे रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत संबंधित क्षेत्राची पाहणी करून शेतकऱ्यांची रूजवात तपासणार आहेत.
तोपर्यंत कोणत्याही प्रोसेसधारकांनी उद्योग सुरू करू नयेत, असा स्पष्ट निर्णय बैठकीत घेण्यात आला. प्रत्यक्ष पडताळणीनंतरच प्रोसेस उद्योग सुरू ठेवायचे अथवा नाही याबाबत समिती अंतिम निर्णय घेणार असून तो सर्वांवर बंधनकारक असेल, असे स्पष्ट करण्यात आले.
बैठकीत उपलब्ध शेती क्षेत्राच्या क्षमतेनुसारच प्रक्रिया केलेले पाणी सोडण्यास परवानगी राहील, असेही ठरविण्यात आले. कोणत्याही परिस्थितीत अतिरिक्त पाणी ओढा किंवा पंचगंगा नदीत सोडले जाणार नाही. जर प्रक्रिया केलेले पाणी नदीत किंवा ओढ्यात सोडल्याचे आढळून आले, तर संबंधित प्रोसेस उद्योग तत्काळ बंद करण्यात येतील, यास प्रोसेसिंग असोसिएशनच्या प्रतिनिधींनी मान्यता दिली.
आंदोलन अंकुश संघटनेचे धनाजी चुडमुंगे यांनी, “प्रोसेसचे पाणी पंचगंगेत आढळल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता इचलकरंजी शहराचा पाणीपुरवठा रोखण्यात येईल,” असा इशारा दिला.
बैठकीत महापौर उदय धातुंडे, अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे-कोल्हे, उपमहापौर अनिल डाळ्या, गटनेते विठ्ठल चोपडे, नगरसेवक राजू बोंद्रे, भाऊसो आवळे, एमपीसीबीचे क्षेत्रीय अधिकारी आंदोलन अंकुश संघटनेचे धनाजी चुडमुंगे,आयुब पट्टेकरी,अंकुश पाटील,प्रभाकर बंडगर,बापुसो तेरदाळे,संदीप मोघे,प्रकाश गौड, पियुष जाधव यांच्यासह आंदोलक व कार्यकर्ते उपस्थित होते.
चर्चा करताना आंदोलन अंकुशचे कार्यकर्ते.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








