ICHMH51NEWS.IN
9921600800

खोतवाडीत फायटर हल्ल्याने खळबळ; सहा जणांविरोधात गंभीर गुन्हा दाखल

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

खोतवाडीत फायटर हल्ल्याने खळबळ; सहा जणांविरोधात गंभीर गुन्हा दाखल

इचलकरंजी :
पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून तरुणाला रस्त्यात अडवून फायटरने हल्ला केल्याची आणि त्यानंतर घरात घुसून कुटुंबीयांवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना खोतवाडी परिसरात घडली. याप्रकरणी शाहापूर पोलिस ठाण्यात सहा जणांविरोधात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओम सुहास नर्मदे (वय १९, रा. हनुमान मंदिर, जावइवाडी, तारदाळ, ता. हातकणंगले) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुजल नलवडे, जय उर्फ मोन्या ओगले, यश ओगले, हेमंत मुसळे, युवराज उर्फ प्रतिम खांडेकर व विजय शिंदे (सर्व रा. खोतवाडी, ता. हातकणंगले) यांच्याविरोधात
 गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटना शुक्रवारी (दि.१५) रात्री साडेनऊच्या सुमारास आरोही परमिटरूम बिअरबारसमोर रोडवर तसेच रात्री दहाच्या सुमारास फिर्यादीच्या घरात घडली. फिर्यादी व आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे असून आरोपी सुजल नलवडे हा फिर्यादीचा नातेवाईक असल्याचे सांगण्यात आले.
पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून आरोपींनी फिर्यादीची मोटारसायकल अडवून कानशिलात मारहाण केली. तसेच फिर्यादी व त्यांचा भाऊ गणेश नर्मदे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ करण्यात आली. आरोपी जय उर्फ मोन्या ओगले याने फिर्यादीच्या पाठीत फायटरने वार करून जखमी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
दरम्यान, फिर्यादी तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात जात असल्याचे समजल्यानंतर आरोपींनी फोन करून “तक्रार दिलीस तर तुला आणि तुझ्या घरातील लोकांना जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.
यानंतर आरोपींनी तीन मोटारसायकलींवरून फिर्यादीच्या घराकडे जात घरात घुसून सागर दत्तात्रय नर्मदे (वय ४६) व अजय वसंत चौगुले (वय ३९) यांना मारहाण केली. तसेच फायटरने डोक्यात व तोंडावर वार करून जखमी केल्याचे पोलिसांनी सांगितले.
या घटनेत ओम नर्मदे, सागर नर्मदे व अजय चौगुले हे जखमी झाले आहेत. दाखल अंमलदार म्हणून पोहेकॉ उदय पाटील यांनी काम पाहिले असून पुढील तपास शाहापूर पोलीस करत आहेत.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा