प्रलंबित वैद्यकीय बिले तात्काळ द्या; आयुष्मान भारत योजनेसाठी विशेष मोहीम राबवा – उमाकांत दाभोळे
इचलकरंजी :
इचलकरंजी महानगरपालिकेतील अधिकारी, कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेली वैद्यकीय बिले तात्काळ अदा करण्यात यावीत तसेच आयुष्मान भारत योजनेअंतर्गत सर्व पात्र कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात यावी, अशी मागणी भाजपा इचलकरंजी पश्चिमचे उपाध्यक्ष उमाकांत दाभोळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
महापौर, आयुक्त व उपमहापौर यांना दिलेल्या निवेदनात दाभोळे यांनी अनेक कर्मचाऱ्यांना गंभीर आजारांवरील उपचारासाठी स्वतःच्या खिशातून मोठा खर्च करावा लागत असून वैद्यकीय बिले महिनोनमहिने प्रलंबित राहिल्याने आर्थिक ताण वाढत असल्याचे म्हटले आहे. शहर प्रशासनाचा कणा असलेल्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या प्रश्नांकडे प्रशासनाने संवेदनशीलतेने पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
GST भरपाई अनुदानातून प्रलंबित बिले अदा करावीत, बिल मंजुरीसाठी कालमर्यादा निश्चित करावी व भविष्यात बिले प्रलंबित राहू नयेत यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच आयुष्मान भारत योजनेसाठी विशेष शिबिरे घेऊन सर्व पात्र कर्मचाऱ्यांची नोंदणी पूर्ण करावी व आरोग्यविषयक प्रश्नांसाठी कायमस्वरूपी समन्वय समिती स्थापन करावी, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800





