“पाण्यासाठी एकजूट” : इचलकरंजीत शुक्रवारी भव्य जल पदयात्रेचे आयोजन
सुळकुड पाणी योजना तात्काळ कार्यान्वित करण्याची मागणी; शहराला स्वच्छ व मुबलक पाणी देण्याचा शिवशाहू आघाडीचा निर्धार
इचलकरंजी
इचलकरंजी शहराच्या जिव्हाळ्याच्या आणि अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पाणी प्रश्नासाठी आता नागरिकांनी एकत्र येण्याची वेळ आली असून, मंजूर असलेली सुळकुड पाणी योजना तात्काळ कार्यान्वित करावी तसेच शहराला स्वच्छ, शुद्ध आणि मुबलक पाणीपुरवठा मिळावा या प्रमुख मागण्यांसाठी शिव-शाहू विकास आघाडी व महाविकास आघाडी, इचलकरंजी यांच्या वतीने भव्य “जल पदयात्रेचे” आयोजन करण्यात आले आहे.
शहरातील नागरिकांना आजही पाण्यासाठी मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अनेक वर्षांपासून विविध पाणी योजना जाहीर झाल्या, मंजूर झाल्या, आश्वासने देण्यात आली; मात्र प्रत्यक्षात नागरिकांच्या नळापर्यंत पुरेसे आणि स्वच्छ पाणी पोहोचले नसल्याची खंत आयोजकांनी व्यक्त केली आहे.
काही राजकीय नेत्यांनी नाट्यगृह चौकात मोठमोठ्या सभा घेत “इचलकरंजीला पाणी आम्हीच देणार” अशी आश्वासने दिली. नागरिकांनी विश्वास ठेवून त्यांना दोन वेळा आमदारकी तसेच खासदारकीची संधी दिली; मात्र निवडणुका संपल्यानंतर पाण्याचा प्रश्न तसाच प्रलंबित राहिल्याचा आरोपही करण्यात आला.
“सभा झाल्या, आश्वासनं झाली, ठराव मंजूर झाले… पण इचलकरंजीकरांच्या घागरी मात्र आजही रिकाम्याच राहिल्या,” अशा शब्दांत नागरिकांच्या भावना व्यक्त करण्यात आल्या. “जनसभांमध्ये टाळ्यांचा गजर झाला, बैठका वर्षानुवर्षे सुरू राहिल्या; पण इचलकरंजीकरांची तहान अजून भागलेली नाही,” अशी टीकाही यावेळी करण्यात आली.
आश्वासनांच्या पाइपलाइन मोठ्या झाल्या; मात्र पाण्याच्या पाइपलाइन कोरड्याच राहिल्या. शहरातील हजारो कुटुंबांना आजही अपुऱ्या आणि अस्वच्छ पाण्याचा सामना करावा लागत असून, जनतेला आता घोषणा नव्हे तर नळाला पाणी हवे आहे, अशी भूमिका शिवशाहू आघाडीच्या वतीने मांडली.
या पार्श्वभूमीवर इचलकरंजीकरांच्या पाण्याच्या हक्कासाठी ही जल पदयात्रा आयोजित करण्यात आली असून, ही कोणत्याही एका पक्षाची किंवा गटाची नसून संपूर्ण इचलकरंजीच्या अस्तित्वाची लढाई असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. त्यामुळे सर्व नागरिकांनी गट-तट, पक्ष आणि राजकीय विचार बाजूला ठेवून मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या जल पदयात्रेची सुरुवात गावभाग येथील श्री महादेव मंदिर येथे महादेवाच्या पिंडीस जलाभिषेक घालून होणार आहे. “शहरातील प्रत्येक घरात पाण्याचा थेंब पोहोचावा” अशी प्रार्थना करत ही पदयात्रा शहरातील विविध भागातून मार्गक्रमण करणार आहे.
शहरातील प्रत्येक भागातील नागरिकांच्या भावना, वेदना आणि पाण्याची तगमग शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी ही पदयात्रा काढण्यात येणार असून, शेवटी शहापूर गावचावडी समोरील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे “जागर सभा” होणार आहे. यावेळी शहराच्या पाणी प्रश्नावर शासनाचे लक्ष वेधून सुळकुड पाणी योजना तातडीने सुरू करण्याची जोरदार मागणी करण्यात येणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील यांनी दिली.
या जल पदयात्रेत शिव-शाहू विकास आघाडीचे सर्व नगरसेवक, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, युवक, महिला तसेच हजारो नागरिक सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले.
जल पदयात्रेचा मार्ग
त्रिशुल चौक – महासत्ता चौक – सहकारनगर – आसरानगर – पाटील मळा – महादेव मंदिर (गावभाग) – मंगळवार पेठ – महात्मा गांधी पुतळा चौक – धान्य ओळ – देवज्ञ ज्वेलर्स चौक – लालनगर – सुतार मळा – छत्रपती संभाजी महाराज चौक – लिंबू चौक – किसान चौक – तीन बत्ती चौक – सुदर्शन चौक – हत्ती चौक – बंडगर माळ चौक – गोकुळ चौक – एएससी कॉलेज – पारीख ठाकरे चौक – स्वामी अपार्टमेंट – जोतिबा मंदिर – सोनाली हॉटेल कॉलनी – मॉडर्न हायस्कूल रोड – पाण्याची टाकी – विकासनगर – महानगरपालिका मुख्य प्रवेशद्वार – कामगार चाळ – साईबाबा मंदिर – जोतिर्लिंग पान शॉप – फुटाणे दवाखाना गल्ली – बालाजी चौक – शाहू महाराज पुतळा – मराठा चौक – शिवा चौक – कृष्णानगर – जाधव पेट्रोल पंप – भोईनगर – दत्त मंदिर – मुदाळकर मेडिकल – मंदिर दर्गा गल्ली – योगाश्रम – चेतना पतसंस्था मागील बाजू – वर्धमान चौक – बाळूमामा मंदिर – जाधव दवाखाना – रेडेकर गल्ली – अवधूतनगर – पाटील किराणा – काँग्रेस कमिटी, शहापूर – छत्रपती शिवाजी महाराज चौक, गावचावडी समोर, शहापूर येथे “जागर सभा” होणार आहे.
यावेळी गटनेते उदयसिंग पाटील नगरसेवक रणजित जाधव, संजय तेलनाडे, शिवाजी पाटील, अमरजीत जाधव उपस्थित होते.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800





