ICHMH51NEWS.IN
9921600800

दुर्गराज रायगडावर ५ व ६ जूनला भव्य शिवराज्याभिषेक सोहळा ५ ते ७ लाख शिवभक्तांच्या उपस्थितीची शक्यता; इचलकरंजीत ४ जूनला मानाच्या ध्वजाचे पुजन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

दुर्गराज रायगडावर ५ व ६ जूनला भव्य शिवराज्याभिषेक सोहळा.५ ते ७ लाख शिवभक्तांच्या उपस्थितीची शक्यता; इचलकरंजीत ४ जूनला मानाच्या ध्वजाचे पुजन

इचलकरंजी:
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ६ जून १६७४ रोजी झालेल्या ऐतिहासिक राज्याभिषेकाच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी दरवर्षी दुर्गराज रायगडावर साजरा होणारा शिवराज्याभिषेक सोहळा यंदा ५ व ६ जून रोजी मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने आयोजित या लोकोत्सवात देशभरातील लाखो शिवभक्त सहभागी होणार असून, यंदा ५ ते ७ लाख शिवभक्त उपस्थित राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याबाबतची माहिती सचिन वरपे व प्रकाश मोरबाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
समितीचे मार्गदर्शक युवराज संभाजी छत्रपती महाराज आणि युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. “धार तलवारीची, युद्धकला महाराष्ट्राची”, “जागर शिवशाहिरांचा” आणि “सोहळा पालखीचा, स्वराज्याच्या ऐक्याचा” ही यंदाच्या सोहळ्याची प्रमुख आकर्षणे असणार आहेत.
५ जून रोजी पाचाड येथील राजमाता जिजाऊंच्या समाधीस अभिवादन करून सोहळ्याला प्रारंभ होईल. त्यानंतर नाणे दरवाजा येथे स्वागत, गडपूजन, युद्धकलेची प्रात्यक्षिके, डोलवादन, लेझीम, शाहिरी कार्यक्रम, शिरकाई देवीचा गोंधळ तसेच कीर्तन-भजनाचे कार्यक्रम होणार आहेत.
मुख्य सोहळा ६ जून रोजी पार पडणार असून ध्वजपूजन, ध्वजारोहण, शाहिरी कार्यक्रम, शिवछत्रपती महाराजांच्या पालखीचे आगमन, उत्सवमूर्ती व सिंहासनावरील मूर्तीचा अभिषेक आणि युवराज संभाजी छत्रपती महाराजांचे शिवभक्तांना मार्गदर्शन हे कार्यक्रम होणार आहेत. त्यानंतर भव्य पालखी सोहळा जगदीश्वर मंदिराकडे प्रस्थान करेल. वारकरी संप्रदायाला मानाचा ध्वज प्रदान केल्यानंतर शिवरायांच्या समाधीस अभिवादन करून सोहळ्याची सांगता होईल.
शिवभक्तांच्या सोयीसाठी सुसज्ज पार्किंग व्यवस्था तसेच पाच ठिकाणी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. पत्रकार परिषदेला इचलकरंजी गिरिभ्रमण संघटनेचे सचिन वरपे, प्रकाश मोरबाळे, नगरसेवक योगेश पाटील, किरण कोठावळे, राजेंद्र ढपाले आणि संजय हजारे उपस्थित होते. विशेष म्हणजे रायगड येथील मुख्य समितीत सचिन वरपे आणि प्रकाश मोरबाळे यांचा समावेश करण्यात आला आहे. इचलकरंजी व परिसरातून दरवर्षी सुमारे ५ हजार शिवभक्त या ऐतिहासिक सोहळ्यासाठी रायगडावर उपस्थित राहतात.
रायगड किल्यावरील मानाच्या भगव्या ध्वजाचे इचलकरंजीत पुजन
इचलकरंजी गिरिभ्रमण संघटना यांना दुर्गराज रायगड येथे ६ जून रोजी नगारखाना समोर ८५ मीटरच्या कापडाचा भव्य भगवा ध्वज फडकविण्याचा मान आहे. या निमित्ताने ४ जून रोजी इचलकरंजी शिवतीर्थ येथून या मानाच्या भगव्या ध्वजाचे पूजन आजी माजी लोकप्रतिनिधी,महापौर,उपमहापौर यांच्या हस्ते करून हा ध्वज रायगडाकडे खाना होणार असून शिवभक्तांनी ध्वज पूजनासाठी ४ जून रोजी सकाळी ठीक ८ वाजता शिवतीर्थ येथे आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन  अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समिती दुर्गराज रायगड व इचलकरंजी गिरिभ्रमण संघटना यांच्यावतीने करण्यात आले आहे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा