पंचगंगा प्रदूषणप्रश्नी समान निकषांवर कारवाईची मागणी,उद्योगांसह कामगारांनाही न्याय द्या; इंटकचे निवेदन
इचलकरंजी:
पंचगंगा नदी प्रदूषण नियंत्रणासाठी सर्व संबंधित घटकांवर समान निकषांवर कारवाई करून पर्यावरण संरक्षणासोबतच कामगारांच्या रोजगाराचेही संरक्षण करावे, अशी मागणी राष्ट्रीय प्रोसेसिंग कामगार संघटना (इंटक) यांनी प्रांताधिकारी दीपक शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. अन्यायकारक निर्णय झाल्यास आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही संघटनेने दिला आहे.
पंचगंगा प्रदूषणाच्या मुद्द्यावर शिरोळ तालुक्यात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजीतील प्रोसेस उद्योगांवर कारवाई करण्यात येत आहे. गेल्या महिनाभरापासून अनेक प्रोसेस उद्योग बंद असल्याने हजारो कामगारांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. निवेदनात प्रदूषणासाठी केवळ इचलकरंजीतील प्रोसेस उद्योगांना जबाबदार धरणे योग्य नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.
संघटनेच्या मते, पंचगंगा नदी प्रदूषणासाठी विविध औद्योगिक व अन्य घटक कारणीभूत असून काही मोठ्या उद्योगांमधूनही रसायनमिश्रित पाणी नदीपात्रात सोडले जात आहे. त्यामुळे एकाच क्षेत्रावर कारवाई करणे अन्यायकारक ठरत आहे. तसेच प्रक्रिया केलेले पाणी शेतीसाठी वापरण्याच्या अटींमुळे उद्योगांचे कामकाज नियमितपणे चालत नसल्याने कामगारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
शिष्टमंडळात शिवाजी भोसले, प्रदीप साहू, दशरथ मोहिते, राजेंद्र बचाटे, नरसिंह पारीक, मंगल सुर्वे, पंढरीनाथ गलगले, अरुण शिंगे, अमोल गोंधळी, अविनाश शिंदे, रमेश गडकरी, बापू घुले यांच्यासह अनेक कामगार उपस्थित होते.
प्रांताधिकरी दीपक शिंदे यांना निवेदन देताना इंटकचे पदाधिकारी.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800



