इचलकरंजी उपविभागात गुन्हेगारांविरोधात विशेष मोहीम; ११३ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
इचलकरंजी:
कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने इचलकरंजी उपविभागातील सराईत व रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाईसाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत ११३ आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांच्याकडून चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र घेण्यात आले, तर वॉरंटमधील सात आरोपींना अटक करण्यात आली.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल आणि अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ही विशेष मोहीम आयोजित करण्यात आली होती. गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालणे, गुन्हेगारांमध्ये सुधारणा घडवून आणणे आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे हा मोहिमेचा उद्देश होता.
उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली इचलकरंजी, शिवाजीनगर, शहापूर, हुपरी आणि कुरुंदवाड पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील मोका गुन्ह्यातील आरोपी, दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेले गुन्हेगार, जेलमधून सुटलेले आरोपी, हिस्ट्रीशीटर, गँग हिस्ट्रीशीटर, वॉरंटमधील आरोपी तसेच अमली पदार्थांच्या गुन्ह्यांतील आरोपी अशा एकूण १८२ रेकॉर्डवरील गुन्हेगारांना हजर करण्यात आले.
यावेळी सर्व आरोपींची सविस्तर माहिती संकलित करून त्यांचे सर्वेक्षण फॉर्म भरून घेण्यात आले. तसेच त्यांना चांगल्या वर्तणुकीबाबत सूचना देण्यात आल्या. गुन्हेगारी प्रवृत्तीपासून दूर राहून कायद्याचे पालन करावे, सामाजिक स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी जबाबदार नागरिक म्हणून वागावे, अशी समज आरोपींना देण्यात आली.
अपर पोलीस अधीक्षक तथा विशेष कार्यकारी दंडाधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या उपस्थितीत ११३ आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. याशिवाय वॉरंटमधील सात आरोपींना अटक करण्यात आली असून त्यापैकी दोन आरोपींना न्यायालयीन आदेशानुसार कारागृहात पाठविण्यात आले आहे.
गुन्हे प्रतिबंध आणि कायदा-सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी अशा प्रकारच्या विशेष मोहिमा यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले.
गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करताना पोलीस अधिकारी
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800






