इचलकरंजी कोल्हापूर मार्गावर विनाथांबा वातानुकूलित बससेवेस सुरवात
इचलकरंजी:
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या इचलकरंजी आगाराच्या वतीने कोल्हापूर-इचलकरंजी-कोल्हापूर या मार्गावर वातानुकूलित ई-बस सेवेला आजपासून प्रारंभ करण्यात आला. पर्यावरणपूरक, आरामदायी आणि जलद प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही सेवा सुरू करण्यात आली आहे.
या ई-बस सेवा विनावाहक व विनाथांबा स्वरूपात चालविण्यात येणार असून कोल्हापूर आणि इचलकरंजी दरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. दोन्ही शहरांमधील विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक तसेच दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही सेवा विशेष उपयुक्त ठरणार आहे.
राज्य परिवहन महामंडळाकडून महिलांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी तसेच अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या सर्व प्रवासी सवलती या ई-बस सेवेलाही लागू राहणार आहेत. त्यामुळे विविध घटकांतील प्रवाशांना या आधुनिक सेवेचा लाभ घेता येणार आहे.
प्रदूषणमुक्त वाहतुकीला प्रोत्साहन देत आधुनिक सार्वजनिक परिवहन व्यवस्थेकडे टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे आगार प्रशासनाने सांगितले. इचलकरंजी पंचक्रोशीतील नागरिकांनी या वातानुकूलित ई-बस सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन इचलकरंजी आगार व्यवस्थापक सागर पाटील यांनी केले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800






