इचलकरंजी महानगरपालिकेचा ४ था वर्धापन दिन विविध उपक्रमांनी साजरा होणार
इचलकरंजी, दि. २२ : इचलकरंजी महानगरपालिकेच्या स्थापनेला चार वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर दि. २१ जून ते १ जुलै २०२६ या कालावधीत ‘वर्धापन सप्ताह’ विविध सामाजिक, आरोग्य, क्रीडा व जनजागृतीपर उपक्रमांनी साजरा करण्यात येणार असल्याची माहिती महापौर उदय धातूंडे व अति आयुक्त सुषमा शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या उपक्रमांची सुरुवात २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग शिबिराने झाली. २२ जून रोजी ‘हर घर संविधान’ उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. २३ जून रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल येथे महानगरपालिका, नंदादीप आय केअर हॉस्पिटल व रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व चिकित्सा शिबिर होणार आहे. त्याच दिवशी विकास परवाने व गुंठेवारी कॅम्प, उद्यान स्वच्छता व दुरुस्ती तसेच पंचगंगा नदी घाट येथे आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले आहे.
२४ जून रोजी लोककल्याण मेळावा, प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत उपक्रम व बीज संकलन कार्यक्रम होणार आहेत. २६ जून रोजी सायकल रॅली, २७ जून रोजी महिला टर्फ क्रिकेट स्पर्धा आणि २८ जून रोजी बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
तसेच २९ जून रोजी स्वच्छता जनजागृती फेरी व कामगार कायद्यावरील व्याख्यान होणार असून ३० जून रोजी महास्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. या वर्धापन सप्ताहाचा समारोप १ जुलै रोजी बक्षीस वितरण, सांस्कृतिक कार्यक्रम व स्नेहभोजनाने होणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.
मागील वर्धापनदिनी लाखो रुपयांचा चुराडा.
मागील वर्धापन दिनासाठी आयोजित कार्यक्रमात सर्व उपक्रम हे सामाजिक संस्थांच्या वतीने राबवण्यात येणार असून महानगरपालिकेवर कोणताही भार पडणार नसल्याचे आयुक्तांनी सांगितले होते मात्र स्टोअर विभागाकडून महानगरपालिका वर्धापनदिनासाठी बऱ्याच कार्यक्रमाच्या
डिव्हीडी ९८०० रुपये प्रमाणे,डिजिटल बोर्ड ९८ रुपये प्रति चौरस फूट प्रमाणे,कार्यक्रमाचे १००-१०० फोटो ६५ रुपयाप्रमाणे असे लाखो रुपये अनावश्यक रित्या खर्च करण्यात आले आहेत.याबाबत प्रश्न उपस्थित केल्यावर महापौरानी लेखी तक्रार करण्यास सांगितले.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







