‘हर घर संविधान’ उपक्रमांतर्गत संविधान उद्देशिकेचे वाटप
इचलकरंजी महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त जनजागृती उपक्रम
इचलकरंजी,:
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘हर घर संविधान’ या उपक्रमांतर्गत शहरातील मिळकतधारकांना भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाटप करण्यात आले. संविधानातील मूल्ये प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवून जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
या कार्यक्रमाचा शुभारंभ सोमवारी महापौर उदय धातुंडे यांच्या हस्ते झाला. यावेळी अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, उपायुक्त नंदू परळकर, उपायुक्त राहुल मर्ढेकर, उपायुक्त विद्या कदम, सहायक आयुक्त संतोष जिरगे व रोशनी गोडे उपस्थित होते.
यावेळी महापौर उदय धातुंडे यांनी नागरिकांना भारतीय संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूलभूत मूल्यांचा स्वीकार करून संविधानाने दिलेले अधिकार आणि कर्तव्यांविषयी जागरूक राहण्याचे आवाहन केले. संविधानाची उद्देशिका प्रत्येक घरापर्यंत पोहोचवून नागरिकांमध्ये घटनात्मक मूल्यांविषयी जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास सहायक कर संकलन अधिकारी दिपक खोत, सुशील पाडळकर यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत संविधान उद्देशिका स्वीकारून संविधानातील मूल्यांचे जतन करण्याचा संकल्प व्यक्त केला.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







