मजुरीवाढ व कल्याणकारी मंडळासाठी यंत्रमाग कामगारांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन
इचलकरंजी:
यंत्रमाग उद्योगातील कामगारांना मजुरीवाढ आणि “यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळ” स्थापन करण्याच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन कामगार संघटनांनी केले आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात संघटनांनी दावा केला आहे की, इचलकरंजीतील यंत्रमाग कामगारांना गेल्या अनेक वर्षांपासून अपेक्षित मजुरीवाढ मिळालेली नाही. २०१३ मध्ये झालेल्या आंदोलनानंतर काही प्रमाणात वाढ लागू झाली होती; मात्र त्यानंतर मजुरीत वाढ झालेली नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. वाढती महागाई, बदलत्या कामाच्या अटी आणि उद्योगातील कामगारांच्या परिस्थितीचा विचार करून नव्याने वेतन संरचना निश्चित करण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात जॉबर, कांडीवाली महिला कामगार, हेल्पर, चेकर व मेंडिंग कामगार यांच्या कामाच्या अटी, अपुरे वेतन आणि रोजगारातील अस्थिरता याबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. किमान वेतन, आठ तासांचे काम आणि कामगारांसाठी कल्याणकारी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी संघटनांनी केली आहे.
दरम्यान, कामगार प्रतिनिधींनी आमदार प्रकाश आवाडे यांची भेट घेऊन यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळाबाबत निवेदन दिल्याची माहिती दिली. त्यानंतर मुख्यमंत्री स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन मिळाल्याचा दावा करण्यात आला.
या पार्श्वभूमीवर दि. २९ जून रोजी सकाळी ११ वाजता प्रांत कार्यालयासमोर निदर्शने आणि दुपारी ४ वाजता शाहूनगर-चंदूर येथील मलाबादे कामगार भवन येथे विभागीय मेळावा आयोजित करण्यात आला असून सर्व यंत्रमाग कामगारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कॉम्रेड भरमा कांबळे यांनी केले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







