थकीत देण्यांसाठी इचलकरंजी महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण सुरू
कृती समितीच्या म्हणण्यानुसार, सुमारे १८५ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची आठ ते नऊ कोटी रुपयांची देणी अद्यापही प्रलंबित आहेत. यापूर्वी अनेक वेळा निवेदने देऊन तसेच प्रशासनाशी चर्चा करूनही प्रश्न निकाली न निघाल्याने उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे आंदोलकांनी सांगितले. याआधीही सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले होते. त्यावेळी काही कर्मचाऱ्यांची देणी अदा करण्यात आली; मात्र उर्वरित कर्मचाऱ्यांचे प्रश्न अद्यापही प्रलंबित आहेत.
या आंदोलनाचे नेतृत्व कृती समितीचे अध्यक्ष के. के. कांबळे, कार्याध्यक्ष शिवाजी जगताप, ज्येष्ठ कामगार नेते प्राचार्य ए. बी. पाटील, सचिव हरी माळी, पेन्शनर असोसिएशनचे अध्यक्ष मुस्ताक मोमीन, सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे सचिव दर्याप्पा परीट, तसेच विविध कामगार संघटनांचे पदाधिकारी करत आहेत.
उपोषणात सुखदेव सोनीकर, सुवर्ण कानडे, सावित्री भंडारे, कल्पना कांबळे, मुस्ताक मोमीन, शिवाजी जोगळेकर, मंगल आवळे, कमल आवळे, पुंडलिक कुरणे आणि रेखा साठे हे दहा सेवानिवृत्त कर्मचारी सहभागी झाले आहेत. आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी महिला नगरसेविका व नगरसेवकांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलकांना जाहीर पाठिंबा दिला.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800





