जूने दानवाड पाणी योजनेच्या सल्लागार नियुक्तीला मतदानाने मंजुरी; विरोधकांचा तीव्र विरोध
इचलकरंजी :
इचलकरंजी शहरासाठी प्रस्तावित जूने दानवाड पाणीपुरवठा योजनेसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार (PMC) नियुक्तीचा विषय सोमवारी झालेल्या महापालिका महासभेत ४१ विरुद्ध १२ मतांनी मंजूर झाला. त्यामुळे प्रशासनाने सुचविलेल्या यश इंजिनिअरिंग कन्सल्टन्सी (मुंबई) या कंपनीची नियुक्ती करण्याचा मार्ग मोकळा झाला. मात्र, या नियुक्तीसाठी खुली निविदा प्रक्रिया राबविण्याची विरोधकांची मागणी फेटाळण्यात आल्याने सभागृहात जोरदार वाद झाला.या कंपनीने इचलकरंजी शहरातील एकही काम व्यवस्थित केले नसून पांढऱ्या पायाची कंपनी असल्याची टीका विरोधी पक्ष नेते उदयसिंग पाटील यांनी केली.
महापौर उदय धातुंडे यांच्या अध्यक्षतेखाली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात झालेल्या महासभेत एकूण १९ विषयांवर चर्चा झाली.
सुरवातीला नगरसेविका रूपा बुगड यांनी निरामय रिंग रोडच्या रखडलेल्या कामावरून प्रशासनावर हल्लाबोल केला. पावसाळ्यापूर्वी पॅचवर्क का झाले नाही, तसेच अधिकारी फोन उचलत नसल्याची तक्रार त्यांनी केली. यावर महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना नगरसेवकांचे फोन तत्काळ स्वीकारण्याच्या सूचना दिल्या.
दरम्यान, मागील महासभेचे इतिवृत्त कायम न करता सभा घेतल्याचा आरोप करत विरोधकांनी सभेच्या वैधतेवर प्रश्न उपस्थित केला. ठराव सभागृहात मंजूर झाल्यानंतर त्यामध्ये बदल केल्याचा आरोपही विरोधकांनी केला. यावर महापौरांनी कोणालाही ठराव बदलण्याचा अधिकार नसल्याचे स्पष्ट केले.मात्र सुलकुडच्या बदललेल्या ठरावावर बोलणे त्यांनी टाळले.
सभेत रमाई आवास योजनेतील उर्वरित घरे पूर्ण करण्याचा मुद्दा, शहीद भगतसिंग उद्यान परिसरात खाऊ गल्लीसह वैरण बाजारासाठी जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय, तसेच सोलगे मळ्यातील चार्जिंग स्टेशनवर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याची मागणी यावरही चर्चा झाली.,शहीद भगतसिंग व राणी बागेतील प्रवेश शुल्काचा निर्णय चर्चेविना नामंजूर करण्यात आला.
चर्चेत रवी रजपूते,विठ्ठल चोपडे,अरुणा बचाटे,मदन कारंडे,अमरजीत जाधव,रणजित जाधव यांनी भाग घेतला
विद्या साळुंखे यांना अश्रू अनावर
सभेदरम्यान शिक्षण समिती सभापती विद्या साळुंखे रमाई आवास योजनेतून घरे देण्याबाबत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर बोलत असताना आयुक्तांनी केलेल्या आक्रमक टिप्पणीमुळे त्यांना अश्रू अनावर झाले. आपण कोणत्याही व्यक्तीवर नव्हे, तर प्रशासनाच्या कामकाजावर टीका करत असल्याचे साळुंखे यांनी स्पष्ट करताना तुम्ही महापौरांची परवानगी घेऊन बोलत आहात का असा प्रश्नही आयुक्तांना केला. या घटनेनंतर आयुक्तांच्या वागणुकीबाबत काही नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली.
सुळकुड ठरावावरूनही वाद
सुळकुड पाणी योजनेच्या ठरावात अतिरिक्त मजकूर का समाविष्ट करण्यात आला, तसेच सभागृहात मंजूर झालेला ठराव आणि नंतरच्या नोंदींमध्ये तफावत असल्याचा आरोप करत विरोधकांनी प्रशासनाला धारेवर धरले. आयुक्त महापौरांच्या अधिकारांवर गदा आणत असल्याचा आरोपही विरोधी पक्षनेते उदयसिंह पाटील यांनी यावेळी केला.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800





