यंत्रमाग ऑनलाइन नोंदणीला तीन महिन्यांची मुदतवाढ; वस्त्रोद्योग मंत्र्यांची घोषणा,यंत्रमागधारक जागृती संघटनेचा पाठपुरावा
मुंबई: राज्यातील यंत्रमागधारकांच्या ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी ऑनलाइन नोंदणीसाठी तीन महिन्यांची मुदतवाढ जाहीर केली आहे. तसेच इचलकरंजी, भिवंडी, मालेगाव, सोलापूर, विटा, मनमाडसह सर्व वस्त्रोद्योग क्षेत्रातील यंत्रमागधारक प्रतिनिधींची समिती स्थापन करून त्यांच्या सूचनांनुसार नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
मंगळवारी मंत्रालयात वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या दालनात महाराष्ट्रातील विविध वस्त्रोद्योग केंद्रांतील यंत्रमागधारक प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. यावेळी ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेत येणाऱ्या तांत्रिक व प्रशासकीय अडचणी मांडण्यात आल्या. सध्याची नोंदणी प्रक्रिया रद्द करून सर्व यंत्रमागधारकांच्या प्रतिनिधींची समिती स्थापन करावी व त्या समितीच्या अहवालानुसारच पुढील कार्यवाही करावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.
या मागणीची दखल घेत मंत्री सावकारे यांनी तीन महिन्यांची मुदतवाढ जाहीर केली. तसेच शासनामार्फत स्वतंत्र समिती नेमण्याऐवजी सर्व वस्त्रोद्योग क्षेत्रांतील प्रतिनिधींना सहभागी करून अभ्यास करण्यात येईल. या समितीने नोंदणीचा फॉर्म अधिक सोपा, सुटसुटीत व व्यवहार्य कसा करता येईल, याबाबतचा अहवाल सादर करावा. त्यानुसार वस्त्रोद्योग विभाग पुढील कार्यवाही करेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी विनय महाजन, सुरज दुबे, सचिन कांबळे, सरोषभाई, पुनीत खिमासिया, हिरेन नागदा, रुपेश अग्रवाल, तिरुपती शिरीपुरम, साजीद अन्सारी, शब्बीरभाई, पेंटप्पा गड्डाम, राजू राठी, अंबादास बिंगी यांच्यासह विविध वस्त्रोद्योग क्षेत्रांतील अनेक यंत्रमागधारक प्रतिनिधी उपस्थित होते.
ना.संजय सावकारे यांना निवेदन देताना यंत्रमागधारक जागृती संघटनेचे सदस्य
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800









