घनकचरा व्यवस्थापनाच्या २२ कोटींच्या अंदाजपत्रकाला न्यायालयात आव्हान- उदयसिंग पाटील
विशेष सभेतील ठराव बेकायदेशीर असल्याचा दावा; १७ ऑगस्टला पुढील सुनावणी
इचलकरंजी, ता. ११ :
घनकचरा व्यवस्थापनाच्या सुमारे २२ कोटी रुपये खर्चाच्या अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यासाठी २७ जुलै रोजी झालेल्या विशेष सभेत मंजूर करण्यात आलेल्या ठरावाला मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचकडे आव्हान देण्यात आले आहे. विशेष सभेतील ठराव बेकायदेशीर असल्याचा दावा करत शिव-शाहू विकास आघाडीचे नगरसेवक तथा विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील आणि नगरसेविका रुपाली कोकणे यांनी ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर पुढील सुनावणी १७ ऑगस्ट रोजी होणार आहे.
घनकचरा व्यवस्थापनाच्या कामासाठी सुमारे २२ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समितीच्या सभेत नामंजूर करण्यात आले होते. त्यानंतर विशेष सभा घेऊन याच अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली. स्थायी समितीने नामंजूर केलेल्या विषयावर विशेष सभेला मंजुरी देण्याचा अधिकार आहे का, यासह विशेष सभेतील ठरावाच्या वैधतेवर याचिकेत प्रश्न उपस्थित करण्यात आल्याचे उदयसिंग पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
याचिका दाखल करताना स्थायी समिती सभेचे इतिवृत्त, नामंजूर ठराव, विशेष सभा क्रमांक ७ मधील ठराव क्रमांक १७२ व त्याचे इतिवृत्त, सभेचे चित्रिकरण, विशेष सभा बेकायदेशीर असल्याबाबत आयुक्तांना दिलेले पत्र तसेच ठरावाची अंमलबजावणी करू नये, अशी मागणी करत विभागीय आयुक्त (पुणे) आणि प्रधान सचिव, नगरविकास विभाग यांना दिलेल्या पत्रांसह विविध कागदोपत्री पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले आहेत.
या प्रकरणात महापालिका आयुक्त, विभागीय आयुक्त (पुणे) आणि नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड. कल्पेश पाटील यांनी बाजू मांडली. स्थायी समितीचे अधिकार विशेष सभेला नसल्याचा मुद्दा न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.
ही याचिका दोन सदस्यीय खंडपीठाकडे वर्ग करण्यात आली असून न्या. एस. यू. देशमुख आणि न्या. एन. पी. धोटे यांच्या खंडपीठासमोर १७ ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
दरम्यान, या याचिकेमुळे २२ कोटी रुपयांच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या अंदाजपत्रकाचा विषय पुन्हा न्यायालयीन प्रक्रियेत गेला असून, पुढील सुनावणीकडे महापालिका वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
यावेळी नगरसेवक सुनील तेलनाडे, शिवाजी पाटील, परवेज गैबान तसेच माजी नगरसेवक प्रकाश मोरबाळे उपस्थित होते.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800






