ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीच्या ई-बसेसचे नामकरण ‘वस्त्रपरी’; चार्जिंग स्टेशनला छत्रपती संभाजी महाराजांचे, बसस्थानकाला पंतप्रधान मोदींचे नाव

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीच्या ई-बसेसचे नामकरण ‘वस्त्रपरी’; चार्जिंग स्टेशनला छत्रपती संभाजी महाराजांचे, बसस्थानकाला पंतप्रधान मोदींचे नाव

१५ ई-बसेस १५ ऑगस्टपर्यंत शहरात दाखल होण्याची शक्यता; पहिल्या टप्प्यात दोन मार्गांवर धावणार

इचलकरंजी, ता. ११ : इचलकरंजी शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत लवकरच दाखल होणाऱ्या ई-बसेसचे ‘वस्त्रपरी’ असे नामकरण करण्यात आले आहे. महापालिकेच्या परिवहन समितीच्या आज झालेल्या बैठकीत यासंदर्भातील ठराव मंजूर करण्यात आले. सोलगे मळा येथील ई-बसेसच्या चार्जिंग स्टेशनला छत्रपती संभाजी महाराज यांचे, तर शिवतीर्थ परिसरात प्रस्तावित ई-बसस्थानकाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव देण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. परिवहन समितीच्या सभापती अरुणा बचाटे यांनी ही माहिती दिली.

शहरात ई-बसेस सुरू करण्यासाठी एकूण १९ मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. यापैकी पहिल्या टप्प्यात दोन मार्गांवर ई-बसेस धावणार आहेत. टाकवडे मार्गे नृसिंहवाडी आणि शिरोली या दोन मार्गांवर सुरुवातीला ई-बसेसची सेवा सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने अन्य मार्गांवरही ई-बसेस सुरू करण्यात येणार आहेत.

दरम्यान, शहरासाठी मंजूर झालेल्या ई-बसेसपैकी १५ बसेस दिल्लीहून इचलकरंजीकडे रवाना झाल्या आहेत. यामध्ये ३२ आसन क्षमतेच्या १० बसेस, तर ४४ आसन क्षमतेच्या ५ बसेसचा समावेश आहे. या सर्व बसेस १५ ऑगस्टपर्यंत इचलकरंजीत दाखल होण्याची शक्यता असल्याचे बचाटे यांनी सांगितले.

तांत्रिक कारणामुळे विलंब

स्वातंत्र्यदिनापासूनच शहरात ई-बसेस सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, तांत्रिक कारणांमुळे दिल्लीहून बसेस रवाना होण्यास विलंब झाला. त्यामुळे बसेस शहरात दाखल झाल्यानंतर प्रथम मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे.

त्यानंतर ई-बसेसची प्रादेशिक परिवहन विभागाकडे नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली जाणार असून, ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अधिकृत लोकार्पण सोहळा घेऊन प्रत्यक्ष प्रवासी सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे सभापती अरुणा बचाटे यांनी स्पष्ट केले.

ई-बसेसच्या आगमनामुळे इचलकरंजीच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला आधुनिक आणि पर्यावरणपूरक स्वरूप मिळणार असून, शहरासह ग्रामीण भागातील प्रवाशांनाही याचा फायदा होण्याची अपेक्षा आहे.

यावेळी प्रमोद बचाटे उपस्थित होते.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा