गणेशमूर्ती, राखी स्टॉलसाठी महापालिकेचे नियोजन; मुख्य रस्ता मोकळा राहणार
इचलकरंजी, ता. १२ : आगामी रक्षाबंधन आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील गणेशमूर्ती व राखी विक्रेत्यांच्या स्टॉलसाठी महापालिकेने नियोजन केले आहे. गणेशमूर्ती विक्रेत्यांसाठी लायन्स ब्लड बँकेसमोरील रिकाम्या जागेची, तर राखी विक्रेत्यांसाठी नाट्यगृह चौकातील मंगलधामलगतची जागा निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे सण-उत्सवाच्या काळात मुख्य रस्ता वाहतुकीसाठी मोकळा राहणार असल्याची माहिती महापौर उदय धातुंडे यांनी दिली.
दरवर्षीप्रमाणे मुख्य रस्त्यावर स्टॉल लावण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी विक्रेत्यांनी महापौरांची भेट घेऊन केली होती. त्यानंतर महापौर उदय धातुंडे, उपमहापौर अनिल डाळ्या, स्थायी सभापती सतीश मुळीक, सभागृह नेते विठ्ठल चोपडे व सुशांत कलागते यांनी प्रस्तावित जागांची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर महापौर दालनात बैठक घेऊन स्टॉल व्यवस्थेबाबत चर्चा करण्यात आली.
महापौर धातुंडे यांनी सांगितले की, महानगरपालिकेच्या वतीने शहर अतिक्रमणमुक्त करण्याचे नियोजन सुरू आहे. मुख्य रस्त्यावर स्टॉल उभारल्यास वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निश्चित केलेल्या जागांवर विक्रेत्यांनी स्टॉल उभारावेत. या ठिकाणी महापालिकेतर्फे आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. या नियोजनामुळे सणांच्या काळात मुख्य मार्गावरील वाहतूक सुरळीत राहून नागरिकांनाही दिलासा मिळणार आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800






