पंचगंगेतील अतिरिक्त गाळ काढण्याच्या कामाला मिळणार गती
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक; आमदार राहुल आवाडे यांच्या मागणीची दखल
इचलकरंजी : पंचगंगा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात साचलेल्या अतिरिक्त गाळाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुंबई येथे जलसंपदा विभागाच्या कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक झाली. जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत आमदार डॉ. राहुल आवाडे यांनी नदीपात्रातील गाळ काढण्याची मागणी केली. त्यानंतर अतिरिक्त गाळ काढण्याच्या कामाला गती देण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
पंचगंगा नदीपात्रातील गाळ साचल्यामुळे नदीची पाणीवहन क्षमता कमी होत असून, पावसाळ्यात नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होण्याची शक्यता निर्माण होते. विशेषतः नदीची इशारा व धोका पातळी ओलांडल्यानंतर मळेभागासह नदीकाठच्या परिसरात पूराचे पाणी शिरून नागरिकांचे तसेच शेतीचे मोठे नुकसान होते.
या पार्श्वभूमीवर नदीपात्रातील अतिरिक्त गाळ काढून पात्राची खोली आणि पाणीवहन क्षमता वाढविणे आवश्यक असल्याचे आमदार आवाडे यांनी बैठकीत निदर्शनास आणून दिले. गाळ काढण्याचे काम प्रभावीपणे झाल्यास नदीचा प्रवाह सुरळीत होण्यासोबतच पूरस्थितीची तीव्रता कमी करण्यास मदत होऊ शकते, असा मुद्दाही मांडण्यात आला.
आमदार आवाडे यांच्या मागणीची दखल घेत मंत्री विखे पाटील यांनी इचलकरंजी शहरासाठी महत्त्वाच्या असलेल्या या प्रश्नावर तातडीने आवश्यक नियोजन करून कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. त्यामुळे पंचगंगा नदीपात्रातील अतिरिक्त गाळ काढण्याच्या कामाला आता प्रत्यक्ष गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
दरम्यान, नदीपात्र गाळमुक्त करण्यासाठी आवश्यक तांत्रिक बाबी, कामाचे नियोजन आणि प्रत्यक्ष कार्यवाही याबाबत संबंधित विभागांकडून पुढील प्रक्रिया केली जाणार आहे. पंचगंगेतील गाळ काढण्याचे काम पूर्ण झाल्यास इचलकरंजी परिसरातील पूरस्थितीचा धोका कमी करण्याच्या दृष्टीने ते महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.
बैठकीस महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक, मुख्य अभियंता, मंत्रालयीन अधिकारी तसेच संबंधित क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.
चर्चा करताना ना.राधाकृष्ण विखे पाटील,आ.राहुल आवाडे व इतर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800






