सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांचा तातडीने निपटारा करा-शेरसिंग डागोर
इचलकरंजी :
राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांनी शुक्रवारी (दि. १४) इचलकरंजी महानगरपालिकेस भेट देऊन सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांचा आढावा घेतला. यावेळी प्रलंबित समस्या तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
महापौर उदय धातुंडे, आयुक्त पल्लवी पाटील, उपमहापौर अनिल डाळ्या, अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे व स्थायी समिती सभापती सतीश मुळीक यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. सफाई कर्मचाऱ्यांच्या अडचणी, मागण्या तसेच प्रलंबित प्रकरणांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.
लाड-पागे समितीच्या शिफारसीनुसार सफाई कामगारांच्या वारसांना वारसा हक्काचा लाभ देण्याबाबतची प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढावीत, अशा सूचना डागोर यांनी दिल्या. तसेच सफाई कर्मचाऱ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेची प्रभावी व गतीने अंमलबजावणी करून घरकुलांचा प्रश्न सोडवावा, सफाई कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य विमा योजना सुरू करण्याबाबत कार्यवाही करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.
शासन स्तरावरील प्रश्नांसाठी आवश्यक प्रस्ताव तातडीने शासनाकडे पाठविण्याच्या सूचना त्यांनी केल्या. सफाई कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना शैक्षणिक सवलती व सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
बैठकीस परिवहन समिती सभापती अरुणा बचाटे, विविध समित्यांचे पदाधिकारी, नगरसेवक, महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी युनियनचे प्रतिनिधी तसेच सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेरसिंग डागोर यांचा सन्मान करताना आयुक्त पल्लवी पाटील
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







