अल्पवयीन मुलाला टेम्पो चालविण्यास दिल्याने मालकावर गुन्हा; आर.सी. १२ महिन्यांसाठी रद्द
इचलकरंजी : अल्पवयीन मुलाच्या हाती वाहन देऊन त्याच्या तसेच इतर नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी शहापूर पोलिसांनी वाहनमालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील MH-51-C-0169 क्रमांकाच्या छोटा हत्ती टेम्पोची आर.सी. १२ महिन्यांसाठी रद्द करण्यात आली आहे.
दि. ३ ऑगस्ट रोजी यड्राव फाटा येथे हा प्रकार उघडकीस आला. टेम्पोमध्ये माल भरलेला असताना अल्पवयीन मुलगा तो चालवित असल्याचे आढळले. संबंधित मुलाकडे वाहन चालविण्याचा परवाना नसतानाही त्याला वाहन चालविण्यास दिल्याने रस्त्यावरील नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला.
याप्रकरणी टेम्पो मालक रामबहादुर गंगालाल निषाद, रा. सरकार मळा, कबनूर, ता. हातकणंगले यांच्याविरुद्ध शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी टेम्पो ताब्यात घेतला.
यानंतर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, इचलकरंजी यांनी दि. १४ ऑगस्टपासून सदर वाहनाची नोंदणी १२ महिन्यांसाठी रद्द केली असून या कालावधीत वाहन सार्वजनिक ठिकाणी चालविण्यास मनाई केली आहे.
अल्पवयीन मुलांना कोणत्याही परिस्थितीत वाहन चालविण्यास देऊ नये, तसेच वाहनमालकांनीही अशी निष्काळजीपणा करू नये, असे आवाहन शहर वाहतूक शाखेने केले आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीम सुरू करण्यात आली असून, मद्यप्राशन करून वाहन चालवू नये, मोबाईलचा वापर करू नये आणि दुचाकीवर ट्रिपल सीट प्रवास टाळावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







