ICHMH51NEWS.IN
9921600800

कला आणि साहित्य या गोष्टी जगण्याचे प्रयोजन देतात  – विघ्नेश जोशी 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

कला आणि साहित्य या गोष्टी जगण्याचे प्रयोजन देतात

  – विघ्नेश जोशी 

इचलकरंजी दि.२६ ऑगस्ट-
“आजच्या धावपळीच्या जीवनात कला, साहित्य आणि मित्रभाव या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. भौतिक सुविधांच्या पलीकडे जाऊन याच गोष्टी आपल्याला जगण्याचे प्रयोजन देतात. तसेच नवीन पिढीला आपण जाणीवपूर्वक या सर्वांचे महत्त्व पटवून देणे आवश्यक आहे. त्यांना या सांस्कृतिक प्रवाहात प्रयत्नपूर्वक आपणच आणायला हवे, त्यामुळे संवेदनशील समाज निर्माण होण्यास मदत होईल. त्याचबरोबर नवीन पिढीला चांगल्या सवयी लावणे आणि नकार पचविण्यास शिकवणे देखील महत्त्वाचे आहे.” अशा आशयाचे उदगार प्रसिद्ध कलाकार व निवेदक विघ्नेश जोशी यांनी काढले. येथील मनोरंजन मंडळ या संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कृतज्ञता स्नेह मेळावा कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते.
आपल्या ओघवत्या आणि प्रभावी भाषणात त्यांनी अनेक महान साहित्यिक व कलाकारांच्या आठवणी जागवल्या. “आयुष्यात नाणी सदैव उपयोगाला येणार नाहीत, पण गाणी चिरंतन आपल्या सोबत राहतील. संपत्ती आपल्या सोबत सदैव राहील न राहील पण मैत्री अक्षय राहते” अशी तरल भावना त्यांनी आपल्या भाषणात अधोरेखित केली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला जोशी यांच्या तसेच नाट्यपरिषद इचलकरंजी शाखेचे अध्यक्ष डॉ. एस. पी. मर्दा, श्री दगडूलाल मर्दा फाउंडेशनचे कार्यकारी विश्वस्त शामसुंदर मर्दा, साहित्य परिषद इचलकरंजी शाखेच्या अध्यक्षा वैशाली नायकवडे आणि रोटरी क्लब सेंट्रलचे सेक्रेटरी प्रमोद महाजन यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि नटराज प्रतिमा तसेच छत्रपती शिवराय प्रतिमेचे पूजन करण्यात आले. माजी अध्यक्ष रमेश मर्दा व डी. एम. बिरादार आणि महिला विभाग अध्यक्षा सौ. जागृती शहा यांच्या हस्ते पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी झालेल्या कार्यक्रमात माजी वस्त्रोद्योग राज्यमंत्री प्रकाशराव आवाडे, डॉ. एस. पी. मर्दा,  श्यामसुंदर मर्दा, वैशाली नायकवडे, रमेश मर्दा, ॲड. शिवकुमार धड्ड, अतुल शहा, प्रसाद कुलकर्णी व प्रतिक साठे यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. त्याचबरोबर सदरच्या कार्यक्रमासाठी आवर्जून बाहेर गावाहून आलेले रंगकर्मी संजय हळदीकर व अभिनेते संजय मोहिते, कोल्हापूर आणि कवी भीमराव धुळूबुळू, मिरज यांनी आपले समयोचित मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी मनोरंजन मंडळाचे अध्यक्ष समीर गोवंडे यांनी प्रास्ताविक केले तर उपक्रम समन्वयक संजय होगाडे यांनी संस्थेची वाटचाल सांगितली. कार्यक्रमाचे समर्पक सूत्र संचालन मंडळाचे माजी अध्यक्ष ओम पाटणी व कार्यवाह संतोष आबाळे यांनी केले. शेवटी काशिनाथ जगदाळे यांनी आभार व्यक्त केले. येथील मराठा मंडळ सांस्कृतिक भवनमध्ये झालेल्या कार्यक्रमास संस्थेचे हितचिंतक आणि रसिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा