रोटरी सेंट्रल गीत गायन स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद
इचलकरंजी दि.६ सप्टेंबर-
येथील रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल व ॲनस् कमिटी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘रोटरी सेंट्रल आयडॉल’ कराओके गीत गायन स्पर्धेस स्पर्धकांचा आणि रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. इचलकरंजी व परिसर तसेच कोल्हापूर, गडहिंग्लज, सांगली, सातारा भागातील विविध वयोगटातील स्पर्धकांनी प्राथमिक आणि अंतिम फेरीत सुरेल गाणी सादर केली.
या स्पर्धेमध्ये वासिम मुजावर, कोल्हापूर याने प्रथम क्रमांक आणि कनक भुतडा, इचलकरंजी हिने द्वितीय क्रमांक तर आदित्य बल्लाळ, कागल यांने तृतीय क्रमांक मिळविला. स्वप्नाली सुतार, राधानगरी आणि समर्था होगाडे, इचलकरंजी यांनी उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त केले. या स्पर्धेचे परीक्षक या नात्याने प्रसिद्ध गायक महेश हिरेमठ कोल्हापूर, दीपक फडके इचलकरंजी आणि सौ. अश्विनी जोशी, कोल्हापूर यांनी उत्तमरीत्या जबाबदारी पार पाडली.
स्पर्धेच्या सुरुवातीला रोटरी क्लब सेंट्रलचे अध्यक्ष विमलकुमार बंब यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले तर स्पर्धा समन्वयक शिवकुमार धड्ड यांनी प्रास्ताविक केले. प्रोजेक्ट चेअरमन सौ. सायली होगाडे आणि ॲनस् कमिटी चेअरमन सौ. सायली बंब यांनी सूत्र संचालन केले. परीक्षकांचा परिचय सेक्रेटरी प्रमोद महाजन यांनी करून दिला. यावेळी सहाय्यक प्रांतपाल अशोक जैन तसेच परीक्षक व पदाधिकारी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर सौ. शितल धड्ड व सौ. राजश्री महाजन उपस्थित होत्या.
या स्पर्धेत एकूण ४४ स्पर्धकांनी प्राथमिक फेरीत स्वतः निवडलेले गीत सादर केले. त्यामधून अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या ११ स्पर्धकांनी परीक्षकांनी सांगितलेले गीत सादर केले व त्यामधून विजेत्यांची निवड करण्यात आली. पारितोषिक वितरण समारंभ सर्व परीक्षक तसेच पदाधिकारी यांच्या हस्ते संपन्न झाला. याप्रसंगी परीक्षकांनी स्पर्धकांसाठी उपयुक्त असे मनोगत व्यक्त केले. ध्वनी व्यवस्था होगाडे जॉबर यांची होती तर गाण्याच्या ट्रॅकची तांत्रिक बाजू अशोक जैन व निहाल पठाण यांनी सांभाळली. येथील रोटरी श्री दगडूलाल मर्दा मानव सेवा केंद्र सभागृहात सदरचा कार्यक्रम पार पडला.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800






