सिंगल युज प्लास्टिक विक्रेत्यांवर मनपाची कारवाई; ४५ हजारांचा दंड
इचलकरंजी :
मा. महापौर यांच्या आदेशानुसार इचलकरंजी महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने शहरातील एकल वापराच्या बंदी असलेल्या प्लास्टिकची विक्री करणाऱ्या होलसेल व्यापाऱ्यांवर कारवाईची मोहीम राबविली. शुक्रवारी प्रभागनिहाय करण्यात आलेल्या या कारवाईत ९ व्यापारी दुकानांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
घनकचरा विभागाचे मुख्य स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक व मुकादम यांच्या पथकांनी ही कारवाई केली. मोहिमेदरम्यान संबंधित व्यापाऱ्यांकडून एकूण ४५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. तसेच मोठ्या प्रमाणावर बंदी असलेले एकल वापर प्लास्टिक जप्त करण्यात आले.
या कारवाईत मीनू पॅकिंग, एक्सपर्ट इंटरप्राईजेस, गुडलक प्लास्टिक, कन्हैया पपनानी, विशाल ट्रेडर्स, काश्मिर बेकर्स, सुरज स्टेशनरी, सालासर ट्रेडर्स व स्वराज्य डिस्पोजेबल या व्यापारी आस्थापनांचा समावेश होता. एक्सपर्ट इंटरप्राईजेस या दुकानातून सर्वाधिक प्रमाणात बंदी असलेले प्लास्टिक जप्त करण्यात आले.
शहरात पर्यावरणपूरक वातावरण निर्माण करण्यासाठी सिंगलयुज वापराच्या प्लास्टिकवरील बंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यापारी व आस्थापनांवर पुढील काळातही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा महानगरपालिका प्रशासनाने दिला आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800






