पालकमंत्री हसन मुश्रीफांना पाणीप्रश्नी आज काळे झेंडे व निदर्शने. कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. – कृती समितीचे आवाहन.

इचलकरंजी
– “इचलकरंजी सुळकूड पाणी योजना कृति समितीच्या वतीने पाणीप्रश्नी मंत्र्यांना गावबंदी कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. तरीही ‘पाणी देणार नाही. पाणीप्रश्नी रक्ताचे पाट वाहतील’ असे म्हणणारे व पिण्याच्या पाण्याला आणि मतदारसंघातून गेलेल्या नदीला खाजगी मालमत्ता समजणारे पालकमंत्री हसन मुश्रीफ गुरुवार १२ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता राजाराम मैदान विकास कामांचा शुभारंभ या निमित्ताने येत आहेत. कृति समितीने जाहीर केल्याप्रमाणे यावेळी पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमाच्या ठीकाणी काळे झेंडे दाखवून निदर्शने करण्यात येणार आहेत. यासाठी सर्व कार्यकर्ते व नागरिकांनी उद्या गुरुवारी सकाळी ठीक १०.३० वाजता राजाराम मैदान प्रवेशद्वार, बंगला रोड येथे मोठ्या संख्येने जमावे व निदर्शनामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन कृति समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रताप होगाडे यांच्या अध्यक्षतेखाली कृती समिती कार्यालयात झालेल्या या बैठकीस सुहास जांभळे, सयाजी चव्हाण, अभिजित पटवा, प्रसाद कुलकर्णी, कॉ. सदा मलाबादे, विकास चौगुले, प्रताप पाटील, शिवाजी साळुंखे, बजरंग लोणारी, जाविद मोमीन, सुषमा साळुंखे, रिटा रॉड्रिग्युस, इ. प्रमुख उपस्थित होते. दूरध्वनीद्वारे या बैठकीत मदन कारंडे, शशांक बावचकर, राहुल खंजीरे, पुंडलिक जाधव व संजय कांबळे हेही सहभागी झाले होते.
मंत्र्यांना गावबंदी कार्यक्रमाअंतर्गत इचलकरंजी सुळकूड पाणी योजना कृती समितीच्या वतीने ११ ऑगस्ट रोजी अजित पवार यांच्या दौऱ्यास विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तथापि प्रशासनाची विनंती, जिल्हाधिकारी यांची मुख्यमंत्र्यांशी झालेली चर्चा व तसे आयुक्तांनी दिलेले लेखी पत्र यामुळे आठ दिवसासाठी गावबंदी कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. तथापि बैठक लावणेबाबत दिलेल्या आश्वासनाची पूर्तता जिल्हाधिकारी यांनी केली नाही. त्यानंतर दि. १४ ऑगस्ट २०२४ रोजी मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली इचलकरंजीच्या विविध प्रश्नांवर बैठक झाली होती. या बैठकीमध्ये अजितदादा पवार यांनी सुळकुड पाणी योजनेविषयी पालकमंत्री हसन मुश्रीफ व आमदार प्रकाश आवाडे यांनी मिळून समन्वय साधावा व तोडगा काढावा असे आवाहन केले होते. तशा पद्धतीच्या बातम्याही प्रसिद्ध झालेल्या होत्या. तथापि प्रत्यक्षात हा न होणारा समन्वय कोण कसा घडविणार हे कोणीही सांगितले नाही. आवाडे मुश्रीफ यांची द्विपक्षीय परस्परविरोधी वक्तव्ये सुरूच आहेत. पण पाणी प्रश्नी दोघांचीही भूमिका राजकीय सोयीचीच आहे. त्यानंतर कृती समितीमार्फत दि. ४ सप्टेंबर रोजी धरणे आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारच्या या वेळकाढू व संधिसाधू भूमिकेचा कृती समितीने निषेध केलेला आहे. तसेच दि. ११ ऑगस्टपासून एक महिना उलटून गेला, तरीही कोणतीही हालचाल न झाल्यामुळे इचलकरंजी सुळकूड पाणी योजना कृती समिती आपल्या निर्णयावर ठाम असून त्यानुसार उद्या दिनांक १२ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता कृती समितीच्या वतीने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना काळे झेंडे दाखवून जोरदार निदर्शने करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. पालकमंत्री यांनी सुळकूड पाणी प्रश्नाचा तोडगा काढल्याशिवाय इचलकरंजीत येऊ नये असे जाहीर आवाहन त्यांना कृती समितीतर्फे करण्यात आलेले आहे.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800