डीकेएएससी मध्ये मराठी वांग्मय मंडळाचे उद्घाटन संपन्न
इचलकरंजी : येथील दत्ताजीराव कदम आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज, इचलकरंजी येथे मराठी विभागाच्या वतीने आयोजित मराठी वाङ्मय मंडळाचे उद्घाटन आणि ‘शब्दसाधना’ या भित्तीपत्रिकेचे उद्घाटन प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. एकनाथ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्राचार्य डॉ. एस. एम. मणेर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.
महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने ‘शब्दसाधना’ या भित्तिपत्रिकेचे उद्घाटन आज संपन्न झाले. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे जीवनचरित्र आणि त्यांनी लिहिलेल्या समृद्ध कविता, ओव्या, म्हणी या साहित्यावर मराठी विभागातील विद्यार्थ्यांनी यंदाची भित्तीपत्रिका प्रदर्शित केली. यावेळी बोलताना प्रो. डॉ. एकनाथ पाटील म्हणाले, “मराठी साहित्याला शेकडो वर्षाची परंपरा आहे. विपुल साहित्य लेखनातून मराठी साहित्याचा परिघ विस्तारात गेला आहे. विद्यार्थ्यांनी मराठी भाषेतील साहित्य वाचनाकडे थोडे गांभीर्याने लक्ष देऊन मराठी साहित्याची पताका आपल्या खांद्यावर घेऊन वाटचाल केले पाहिजे. महाविद्यालयातील भाषेचे वांग्मय मंडळ हे विद्यार्थ्यांच्या वांग्मयीन कलागुणांना वाव देण्यासाठी फार महत्त्वाचे असतात.”
अध्यक्षीय मनोगतामध्ये बोलताना प्राचार्य डॉ. मणेर म्हणाले, “ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, तुकोबांच्या गाथेपासून संतपरंपरेतील सगळे अभंग, भारुडे इथं पासून ते आज पर्यंतच्या सगळ्याच कथा, कविता, नाटक, कादंबऱ्यांनी आपल्यासाठी साहित्याचे खूप मोठे दालन उभे करून ठेवले आहे. शाळा न पाहिलेल्या बहिणाबाई सारख्या कवयित्रीने जगण्याचं तत्त्वज्ञान कवितेतून आपल्यासाठी रेखाटून ठेवले आहे. मराठी कवितेला असणारी प्रदीर्घ ंपरंपरा, मागील शतकापासून मराठी गजलेने निर्माण केलेले अस्तित्व हे तरुण वाचकांना नेहमीच खुणावत असते. विद्यार्थी मित्रांनी या साहित्याकडे जाणीवपूर्वक रमायला हवे. वाचनातून चांगले लेखक चांगले कवी तयार होतात. यासाठीच हे साहित्य आणि महाविद्यालयातील वांग्मय मंडळ असते.”
संस्थाप्रार्थनेने सुरू झालेल्या या समारंभाचे प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख प्रो. डॉ. सुभाष जाधव यांनी केले. तर आभार प्रा. रोहित शिंगे यांनी मानले. यावेळी ग्रंथपाल प्रा. विजय यादव, प्रा. भारती कोळेकर यांच्यासह मराठी विभागातील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन कु. प्रीती भिसे व कु. महेश शेख यांनी केले.
शब्द साधना भित्तिपत्रिकेचे उद्घाटन करताना प्रो. डॉ. एकनाथ पाटील, प्राचार्य डॉ. एस. एम. मणेर व उपस्थित प्राध्यापक व विद्यार्थी.
मराठी वांग्मय मंडळ उद्घाटन प्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ. एस. एम. मणेर व उपस्थित मान्यवर.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800