व्हिजन इचलकरंजीच्या माणुसकीच्या भिंतीस उस्फुर्त प्रतिसाद
इचलकरंजी-
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर गोरगरीब व गरजू नागरिकांना मदतीचा हात पुढे करण्यासाठी व्हिजन इचलकरंजीतर्फे आयोजित केलेल्या माणुसकीची भिंत या उपक्रमास शहर व परिसरातील नागरिकांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमाला शनिवारी सकाळपासूनच नागरिकांकडून कपडे जमा करण्यात आले. तर जमा झालेले कपडे सायंकाळच्या सुमारास कोल्हापूर येथील एकटी या संस्थेला तसेच काही गोरगरीब व गरजूंपर्यंत वाटप करण्यात येत आहे. परिणामी, गरजूंच्या चेहऱ्यावर हसू उमटत असून त्यांच्या घरी दिवाळी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे या उपक्रमाचे सर्व थरातून कौतुक होत आहे.
जिल्ह्यात कोल्हापूरनंतर इचलकरंजीत व्हिजन इचलकरंजी या संस्थेतर्फे २०१६ पासून माणुसकीची भिंत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ‘नको असेल ते द्या व हवे असेल तर ते घेवून जा’ या घोष वाक्याखाली हा उपक्रम गत आठ वर्षांपासून व्हिजन इचलकरंजीमार्फत राबविला जात आहे. यंदाही शहर व परिसरातील नागरिकांतून उदंड प्रतिसाद मिळत आहे.
शनिवार १९ आणि रविवार २० ऑक्टोबर व्यंकटराव हायस्कूल येथे राबविण्यात येत असलेल्या माणुसकीच्या भिंतीवर कपडे नागरिक जमा करत आहेत. यासाठी व्हिजन सदस्यांसह व्यंकटराव हायस्कूलमधील कर्मचाऱ्यांचेही विशेष सहकार्य मिळत आहे.
यावेळी व्हिजन इचलकरंजीचे अध्यक्ष कौशिक मराठे, उपाध्यक्ष इराण्णा सिंहासने, प्रोजेक्ट चेअरमन अमित कुंभार, विजय कुडचे, पवन टिबरेवाल, सचिन कांबळे, सचिन सादळे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800