एकांकिका स्पर्धेच्या पहिल्या दिवशी आश्वासक सादरीकरण
इचलकरंजी:-
येथे आयोजित करण्यात आलेल्या २६व्या मनोरंजन करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या शुभारंभाच्या दिवशी पुणे, सांगली, इचलकरंजी, कोल्हापूर भागातील सहा संघानी आपल्या वेगवेगळ्या विषयावरील एकांकिका उत्साहात सादर केल्या. पहिल्या दिवशी बहुतांशी युवा कलाकारांनी आश्वासक सादरीकरण केले.
मुक्ताई फाउंडेशन पुणे या संघाने मून विदाऊट स्काय ही पहिलीच सकस एकांकिका सादर केली. प्राजक्त देशमुख यांनी लिहिलेली ही एकांकिका प्रणव सपकाळे व मुकुल ढेकळे यांनी दिग्दर्शित केली होती. मानवी इतिहासातील सर्वात अंधाऱ्या काळात घडलेली कथा म्हणजे ही एकांकिका. यामध्ये होलोकोस्ट ट्रेनचा भीषण प्रवास आणि हिटलर काळातील ज्यू लोकांचे करण्यात आलेले हाल दाखविण्यात आले. या अमानवी गोष्टींचा मानवांवर होणारा विचित्र परिणाम या नाटकाच्या माध्यमातून प्रत्ययकारी रीतीने मांडण्यात आला. त्यानंतर कलाकार मंडळी पुणे या संघाने चाहूल ही एकांकिका सादर केली. अक्षय संत आणि विकास कांबळे यांचे लेखन होते, तर बद्रीश कट्टी यांनी ही एकांकिका दिग्दर्शित केली होती. सध्याच्या जगात परस्परांमधील संपत चाललेला संवाद व त्यातून येणारे एकटेपण आणि गावामध्ये येणाऱ्या मोठ्या उद्योगामुळे होणारे दुष्परिणाम या एकांकिकेत दाखविण्यात आले.
पहिल्या दिवशीची तिसरी एकांकिका इचलकरंजी येथील दत्ताजीराव कदम आर्टस् , सायन्स आणि कॉमर्स कॉलेजच्या संघाने सादर केली. माई ही एकांकिका रोहन कोतेकर यांनी लिहिली होती तर अभिजीत मोहिते यांचे दिग्दर्शित केली होते. एका किन्नर – तृतीयपंथी आईने सांभाळलेलं मुल आणि तिची त्याबद्दल असलेली काळजी, त्याचबरोबर एका आईची आणि किन्नरांना या जगात मिळणाऱ्या वाईट वागणुकीची ही कहाणी होती. त्यानंतर चौथी एकांकिका अल्कश निर्मिती सांगली या संघाने सादर केली. विनोद आवळे याचे लेखन होते तसेच दिग्दर्शक म्हणूनही त्यांनीच जबाबदारी पार पाडली. आजच्या धावपळीच्या जगात जगण्यासाठी धडपड करताना माणूस खरं जगणं विसरून जातो आहे या आशयाची ही एकांकिका होती.
शारदा रंजन सांस्कृतिक मंच कोल्हापूर या संघाने त्या पुढील प्रश्न ही एकांकिका सादर केली. लेखन सुधाकर गाढवे यांचे होते तर दिग्दर्शन मुरलीधर बारापात्रे यांचे होते. आपल्याकडे विवाह ही प्रथा वंश सातत्यासाठी अस्तित्वात आली त्यावर भाष्य, त्याचबरोबर लोकसंख्येचा स्फोट, गळेकापू स्पर्धा, वाढती बेरोजगारी अशा समस्यांचा वेध घेण्याचा प्रयत्न यामध्ये होता. पहिल्या दिवशी शेवटची एकांकिका श्री राधे नाटक ग्रुप कोल्हापूर या संघाने सादर केली. निर्झर ही आशयपूर्ण एकांकिका भारत जीवन प्रभू खोत यांनी लिहिली आणि दिग्दर्शित केली होती. मानवी आयुष्यात ए आय आणि तंत्रज्ञानाच्या आहारी जाण्यामुळे मानवी जीवनावर आणि मनावर होणारे परिणाम दाखविण्यात आले. त्याचबरोबर परफेक्शनच्या हव्यासापोटी उद्भवणारा भविष्यातील संघर्ष या एकांकिकेने मांडला आणि रसिकांची दाद मिळवली. येथील श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात झालेल्या या एकांकिकांना इचलकरंजी व परिसरातील तसेच कोल्हापूर, सांगली येथील रसिकांचा प्रतिसाद मिळाला.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800