शांतता व सलोखा अबाधित राखण्यासाठी घराघरात पुस्तकाची आवश्यकता- साहित्यिक कृष्णात खोत
इचलकरंजी ता.६-” मानवी मूल्यांच्या जोपासणेसाठी लेखक अविरत परिश्रमाने लिहीत असतात. गावागावात शांतता व सलोखा अबाधित राखण्यासाठी घराघरात पुस्तक पोहचणे काळाची गरज आहे.” असे प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कार विजेते साहित्यिक कृष्णात खोत यांनी केले.महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग ग्रंथालय संचनालय,जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्यावतीने इचलकरंजीतील कोल्हापूर ग्रंथोत्सव उद्घाटन समारंभात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अमोल येडगे होते.
” टीव्हीचा रिमोट व मोबाईलचा डिस्टर्ब दूर करून शांतचित्ताने पुस्तक वाचन करणे अत्यावश्यक आहे.” असे सांगून श्री.खोत म्हणाले,” पुस्तक निर्मितीसाठी व लेखकांच्या सन्मानासाठी यशवंतराव चव्हाण यांनी मोठे योगदान दिले.”
जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर यांनी स्वागत करून प्रास्ताविकात जिल्हा ग्रंथोत्सव आयोजनाची भूमिका स्पष्ट केली.’भंगार’ आत्मचरित्र लेखक अशोक जाधव यांनी भंगार गोळा करणाऱ्या व्यक्तींच्या व्यथा,वेदना स्पष्ट करून वाचनाने माणूस कसा समृद्ध होतो याचे कथन केले.
आयुक्त ओमप्रकाश दिवटे म्हणाले,” संस्कृती व सामाजिक विकास साधण्यासाठी वाचन अत्यावश्यक आहे.”
जिल्हाधिकारी अमोल येडगे अध्यक्षीय भाषणात म्हणाले,” समाजाला विधायक दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पुस्तके करतात.त्यामुळे वाचन चळवळ गतिमान करण्यासाठी शासन स्तरावर विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते.”
दुसऱ्या सत्रात ‘मराठी भाषेचा अभिजात दर्जा व पुढे’ या विषयावर प्रा.डॉ.हिमांशू स्मार्त यांनी मार्गदर्शन केले.विसुभाऊ बापट (मुंबई) यांचा एकपात्री काव्य नाट्यानुभव -कुटुंब रंगलय काव्यात लक्षवेधी झाला.
सकाळी ९.०० वाजता उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांच्याहस्ते ग्रंथपूजन व ग्रंथदिंडीचा प्रारंभ झाला.शाहीर संजय जाधव यांनी महाराष्ट्र गीत सादर केले.शहरातील प्रमुख मार्गावरून ग्रंथ दिंडी काढली.त्यामध्ये इचलकरंजी शिक्षण मंडळाच्या शाळेतील विद्यार्थी,शिक्षक तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील सार्वजनिक ग्रंथालयाचे पदाधिकारी,कर्मचारी व नागरिकांनी सहभाग घेतला.विद्यार्थ्यांच्या झांजपथक व लेझीम पथकाने नागरिकांचे लक्ष वेधले.ग्रंथोत्सवातील पुस्तकांच्या स्टॉलचे उद्घाटन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याहस्ते झाले.
यावेळी इचलकरंजी महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त सुषमा खोले,सहाय्यक आयुक्त विजय राजापुरे,जिल्हा ग्रंथालय तांत्रिक सल्लागार उत्तम कारंडे,जिल्हा माहिती अधिकारी सचिन आडसूळ,ग्रंथालय निरीक्षक सदाशिव शिंदे,स्वाती पाटील,कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष प्रा.डॉ.सुशांत मगदूम,शामसुंदर मर्दा,आपटे वाचन मंदीरच्या अध्यक्षा सुषमा दातार,माया कुलकर्णी, वैशाली नायकवडे,प्रा.रवींद्र पाटील,ॲड.स्वानंद कुलकर्णी,आनंदा काजवे,शांतिनाथ पाटील,ग्रंथमित्र अरुणकुमार पिसे,संदीप कुंभार आदींसह कोल्हापूर जिल्ह्यातील शासकीय ग्रंथालय पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.प्रा.युवराज मोहिते यांनी सूत्रसंचालन केले. समाजवादी प्रबोधनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी आभार मानले.
फोटोओळ-
१)जिल्हा ग्रंथोत्सव निमित्त ग्रंथदिंडीचा प्रारंभ करताना उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे,जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर व मान्यवर
२)ग्रंथोत्सवात मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी अमोल येडगे शेजारी कृष्णात खोत,आयुक्त ओमप्रकाश दिवटे,अपर्णा वाईकर आदी

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800