लाभार्थ्यांची खाती सोयीच्या बँकेत उघडण्याची आ.राहुल आवाडेंची सुचना
इचलकरंजी:
केवळ कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतच खाते उघडण्याची सक्ती न करता शासनाच्या अध्यादेशानुसार संजय गांधी योजनेतील लाभार्थ्यांचे त्याच्या सोयीच्या बँक खात्यात अनुदान जमा करावे, अशा सूचना करताना आमदार राहुल आवाडे यांनी दोन महिन्यांपासून उत्पन्नाचे दाखले देणे बंद केलेल्या पाचही गावातील तलाठ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली. गोरगरीब लाभार्थ्यांना कोणत्याही शासकीय योजनांपासून वंचित ठेवू नका असे सांगत सर्वांनी मिळून एक टीम वर्क करुया, असे आवाहनही त्यांनी केले.
संजय गांधी निराधार योजना लाभार्थ्यांच्या विविध समस्यांबाबत शनिवारी आमदार राहुल आवाडे यांनी अप्पर तहसिलदार कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी अप्पर तहसिलदार सुनिल शेरखाने, संगांयो समितीचे अध्यक्ष अनिल डाळ्या, सदस्य कोंडीबा दवडते, महेश पाटील, सुखदेव माळकरी, संजय नागुरे, महेश ठोके, सलीम मुजावर, भगत यांच्यासह माजी नगरसेवक संजय केंगार तसेच पाच गावातील तलाठी, सर्कल, संगांयो कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
प्रारंभी समितीच्या सदस्यांनी संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांच्या अडचणीबाबत ऊहापोह केला. दोन महिन्यांपासून तलाठ्यांकडून उत्पन्नाचे दाखले मिळत नसल्याने पात्र असताना अनेक लाभार्थ्यांना दाखले नसल्याने अर्ज करण्यात अडचणी येत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर आमदार आवाडे यांनी तलाठ्यांची झाडाझडती घेताना संघटनांच्या वतीने सुरु असलेले आंदोलन योग्य असले तरी गोरगरीब लाभार्थ्यांना तिष्ठत ठेवू नका. शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी तुम्ही कार्यरत रहा. त्यासाठी उत्पन्न दाखले देण्याचे काम तातडीने पूर्ववत सुरु करण्याच्या सूचना केल्या.
शासनाने थेट डीबीटी द्वारे अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अनुदान जमा केले जात आहे. परंतु अद्यापही इचलकरंजीतील सुमारे 6 हजार लाभार्थ्यांनी बँक खात्याला आधार लिंक न केल्याने डीबीटीपासून वंचित राहिले आहेत. या संदर्भात आमदार आवाडे यांनी सर्वांनी मिळून टीम वर्कच्या माध्यमातून अशा लाभार्थ्यांची खाती आधार लिंक करुन देऊन त्यांना लाभ मिळवून देऊया असे सांगितले. तर एखाद्या लाभार्थ्याला अपात्र करण्यापूर्वी त्याची संपूर्ण घेऊन अर्जाची पडताळणी करुनच निर्णय घ्यावा, असे सूचित केले.
शासनाने डीबीटीच्या माध्यमातून लाभार्थ्याला त्याच्या इच्छेनुसार हव्या त्या बँकेत अनुदान जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु इचलकरंजी कार्यालयातून केडीसीसी बँकेतच खाते काढण्याचा आग्रह केला जात असल्याबद्दल बोलताना आमदार आवाडे यांनी, केडीसीसी बँकेतील अपुर्या स्टाफमुळे त्याठिकाणी संगांयो लाभार्थ्यांना बराच वेळ तिष्ठत बसावे लागते. लाभार्थी पहाटेपासूनच रांगा लावून बसलेले असतात. शिवाय सर्वच लाभार्थी वयोवृध्द असल्याने त्यांना नाहक त्रास सोसावा लागतो. हे सर्व टाळण्यासाठी शासनाच्या धोरणानुसार लाभार्थ्याला त्याच्या सोयीनुसार त्याला हवी ती बँक निवडू द्यावी. कोणाही लाभार्थ्याला जिल्हा बँकेची सक्ती करु नये, असे सांगितले.
आमदार आवाडे यांनी घेतलेल्या या आढावा बैठकीतून लाभार्थ्यांना होणारा त्रास निश्चितपणे कमी होऊन त्यांना विनात्रास अनुदान घेणे सोयीचे होणार असल्याने लाभार्थ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800