कृष्णा पाईपलाईनचा मक्तेदार अचानक अकार्यक्षम कसा?- शशांक बावचकर
इचलकरंजी.
आ.राहुल आवाडे यांनी कृष्णा योजनेच्या मक्तेदारास अकार्यक्षम ठरवण्याचा विधानसभेत मांडलेल्या लक्षवेधीचा प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस शशांक बावचकर यांनी खरपूस समाचार घेतला आहे.
इचलकरंजी शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करणेसाठी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतुन ५.२ किमी ची पाईपलाईन बदलणे साठी २२ कोटी रु च्या प्रस्तावाला मान्यता दिली होती.२० जुन २०२३ रोजी या कामाचे कार्यादेश इलेकॉन एनर्जी ठाणे या कंपनीला देणेत आले होते. तथापी पावणे दोन वर्षाचा कालावधी होऊनही अद्याप सव्वा दोन किमी चे काम प्रलंबीत आहे. सबब महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी प्रश्न उपस्थित करून सदरच्या अकार्यक्षम मक्तेदारावर कारवाई करणेची व त्याला ब्लॅक लिस्ट करणेची मागणी आमदार राहुल आवाडे यांनी केली. वस्तुतः सदर मक्तेदाराला कार्यादेश देताना त्याची आर्थिक कुवत व कार्यक्षमता लक्षात न घेता कार्यादेश द्यायला भाग पाडले का? पश्चिम महाराष्ट्रात व इचलकरंजी शहरात अशा कामाचा अनुभव असणारे मक्तेदार असताना ठाण्याहून याच मक्तेदाराला आयात करणेचे काम नेमके कोण केले? इतर मक्तेदारानी निविदाच भरु नये म्हणून कोणी प्रयत्न केले?इलेकॉन एनर्जी लाच काम देणेत यावे म्हणून तत्कालीन आयुक्तांवर कोणी दबाव आणला? महाविकास आघाडीने सातत्याने हे काम पूर्ण व्हावे म्हणून पाठपुरावा केला असताना मक्तेदाराला चार वेळा मुदतवाढ देणेचे काम कोणाच्या सल्ल्याने झाले? इ प्रश्न महत्वाचे असुन त्याचीही चर्चा होणे आवश्यक आहे. गेली पाच वर्षे शहर तहानेने व्याकुळ असताना आत्ताच या प्रश्नावर पुढाकार कसा काय घेतला जातो असाही प्रश्न शहरवासियाना पडलेला आहे.
मक्तेदार कंपनीला बँक गॅरंटी देणेबाबत आयुक्तां कडे कोण आग्रह धरला होता? वरील सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणे आवश्यक असताना यावर विधीमंडळात प्रश्न उपस्थित करून नेमके काय साध्य होणार आहे? लोकप्रतिनिधीना खरोखरच पाणी प्रश्नाचे महत्व कळले असते तर या कामाचा मक्तेदार कार्यक्षम नेमला असता व काम पूर्ण करून घेतले असते. परंतु थोडेसेच काम शिल्लक असताना या मक्तेदाराला अकार्यक्षम ठरवणे व त्याला काळया यादीत टाकणेची मागणी करणे याला वेगळाच वास येत असलेची चर्चा शहरवासियात आहे असेही शशांक बावचकर यांनी म्हंटले आहे

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800