इचलकरंजी उद्यापासून रंगणार कै.भाई नेरुरकर चषक खो-खो स्पर्धेचा थरार
इचलकरंजी:
वस्त्रनगरीबरोबरच खो-खो ची पंढरी अशी ओळख असलेल्या इचलकरंजीत 24 ते 27 मार्च या कालावधीत शासनाच्या कै. भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. येथील विठ्ठल रामजी शिंदे विद्या मंदिर क्रमांक 21 च्या पटांगणावर ही स्पर्धा होत असून यानिमित्ताने इचलकरंजीकर क्रीडारसिकांना सहकार महर्षि कल्लाप्पाण्णा आवाडे क्रीडानगरीत खो-खो चा थरार पाहण्यास मिळणार आहे, अशी माहिती स्पर्धा समितीचे उपाध्यक्ष आमदार राहुल आवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राज्यातील खो-खो खेळाडूंना राज्य स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळावी या उद्देशाने शासनाच्या वतीने कै. भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो-खो क्रीडा स्पर्धेचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. सन 2024-25 मधील या स्पर्धेचे आयोजन माजी मंत्री प्रकाश आवाडे यांचे प्रयत्नाने इचलकरंजीत होत आहे. इचलकरंजीनगरी ही खो-खो ची पंढरी म्हणून ओळखली जात असल्याने भव्य आणि दिव्य आयोजन करण्याचा निर्णय पालकमंत्री तथा अध्यक्ष आमदार प्रकाश आबिटकर यांच्या स्पर्धा आयोजन समितीने घेतला आहे. स्पर्धेचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते होणार आहे. स्पर्धा शुभारंभपूर्वी महात्मा गांधी पुतळा ते क्रीडांगण अशी खेळाडूंची भव्य रॅली काढण्यात येणार आहे. स्पर्धेचे स्वागताध्यक्ष माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे आहेत. स्पर्धा सकाळी 7 ते 10 आणि सायंकाळ 4 ते 10 या कालावधीत खेळली जाणार आहे.
या स्पर्धेत खुला पुरुष व महिला गट तसेच किशोर व किशोरी वयोगटातील एकूण 40 संघांचा समावेश असणार आहे. स्पर्धेसाठी विठ्ठल रामजी शिंदे प्रशालेच्या पटांगणावर चार मैदाने तयार करून घेण्यात आली आहेत. क्रीडा रसिकांसाठी बैठक गॅलरीची व्यवस्था करण्यात आली आहे. स्पर्धेत सुमारे खेळाडू, संघव्यवस्थापक, मार्गदर्शक असे एक हजार खेळाडू तसेच स्वयंसेवक, तांत्रिक अधिकारी, शासकीय अधिकारी, संघटना पदाधिकारी आदींचा सहभाग असणार आहे. खेळाडूंची राहण्याची व्यवस्था अग्रसेन भवन, तेरापंथी भवन, महेश सेवा समिती, दादावाडी भवन, नामदेव भवन, गायत्री भवन याठिकाणी करण्यात आलेली आहे. प्रेक्षक गॅलरींना कै. मल्हारपंत बावचकर, कै. सदाशिवराव सुलतानपुरे आणि हिंदुराव कौंदाडे अशी नांवे देण्यात आली आहेत.
स्पर्धेमध्ये प्राविण्य मिळविलेल्या संघांसह सर्वोत्कृष्ट खेळाडूंना तब्बल 31 लाखाची रोख पारितोषिके व कै. भाई नेरुरकर चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. तर सहभागी खेळाडू, संघव्यवस्थापक, मार्गदर्शक, स्वयंसेवक, तांत्रिक अधिकारी, इत्यादींना आयोजन समितीमार्फत ट्रॅकसुट तसेच भेटवस्तू वाटप करण्यात येणार आहे. स्पर्धा आयोजनातील तांत्रिक बाबीची जबाबदारी कोल्हापूर खो-खो असोसिएशन यांच्याकडे सोपविण्यात आली असून महाराष्ट्र खो-खो असोसिएश व विदर्भ खो-खो असोसिएशनचे सहकार्य लाभणार आहे. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ 27 मार्च रोजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांचे हस्ते संपन्न होणार आहे, असेही आमदार आवाडे यांनी सांगितले.
स्पर्धेची तयारी पूर्ण झाली असून आयोजनाची जबाबदारी आमदार राहुल आवाडे यांनी स्विकारली आहे. त्यांच्यासोबतच जिल्हाधिकारी अमोल येडगे, आयुक्त पल्लवी पाटील आदी लक्ष ठेवून आहेत. पत्रकार परिषदेत जिल्हा क्रीडा अधिकारी निलिमा अडसुळ, सुनिल पाटील, शेखर शहा, कोल्हापूर जिल्हा खो-खो असोशिएशनचे राजन उरुणकर, प्रशांत पोवार, अरुण पाटील, श्रीरंग खवरे, जी. जी. कुलकर्णी,चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800