इचलकरंजीत १६ ते २२ एप्रिल रोजी पंचकल्याणक महामहोत्सव,दिगंबर जैन बोर्डिंग आवारात कार्यक्रम : विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन.
इचलकरंजी
दक्षिण भारत जैन सभेच्या येथील दिगंबर जैन बोर्डिंग च्या आवारात असलेल्या श्री १००८ चंद्रप्रभ तीर्थंकर जीन मंदिरात १६ ते २२ एप्रिल या कालावधीत पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव व विश्वशांती महायज्ञ चे आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार असल्याची माहिती महोत्सव समितीचे अध्यक्ष रवींद्र पाटील व उपाध्यक्ष सुभाष बलवान यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
शहर आणि पंचक्रोशीतील मुलांसाठी दक्षिण भारत जैन सभेचे विद्यार्थ्यांसाठी दिगंबर जैन बोर्डिंग स्थापन झाले. या बोर्डिंगच्या आवारात १९९९ मध्ये श्री १००८ चंद्रप्रभू मंदिराची उभारणी होऊन या मंदिराचा पंचकल्याण प्रतिष्ठा महोत्सव आचार्य रत्न बाहुबली मुनी महाराज यांच्या सानिध्यामध्ये पार पडला. या महोत्सव ला २५ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल जीन मंदिरातील गर्भग्रहांमध्ये श्वेतवर्णी नयन मनोहर चंद्रप्रभू तीर्थंकर पद्मासनस्थ नूतन प्रतिमा विराजमान करून त्याची पंचकल्याण पूर्वक प्राणप्रतिष्ठा पूजा महोत्सव करण्याचा निश्चय केला आहे. हा सोहळा आचार्यत्न बाहुबली मुनी महाराज यांचे परमशिष्य आचार्य 108 श्री जीनसेन मुनी महाराज व क्षुल्लकरत्न परमपूज्य श्री १०५ समर्पण सागर महाराज यांच्या पावन सानिध्यामध्ये व जगद्गुरु स्वस्तीश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी नांदणी यांच्या आज्ञेवरून आणि जगद्गुरु स्वस्तिश्री श्री लक्ष्मीसेन भट्टारक भट्टाचार्य महास्वामी कोल्हापूर यांच्या पावन उपस्थितीत होत आहे. हा महोत्सव प्रतिष्ठाचार्य पंडित डॉ. सम्मेद उपाध्ये साजणी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणार आहे.
या महोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये बुधवार १६ एप्रिल रोजी ध्वजारोहण व गर्भ कल्याणीक पूर्वार्ध विधि, गुरुवार १७ एप्रिल रोजी नवग्रह होम व गर्भ कल्याण उत्तरार्ध विधी, शुक्रवार १८ एप्रिल रोजी जन्म कल्याणिक आणि पांडूक शिलेवर जन्माभिषेक सोहळा, शनिवार १९ एप्रिल रोजी राज्याभिषेक आणि दीक्षा कल्याणिक सोहळा, रविवार २० एप्रिल रोजी मौजीबंधन, अलंकार पूजा व कुमकुम विधी, सोमवार २१ एप्रिल रोजी केवलज्ञान कल्याणिक महोत्सव व रथोत्सव सोहळा तर मंगळवार २२ एप्रिल रोजी मोक्ष कल्याण आणि महाकलशाभिषेक असा कार्यक्रम होणार आहे.
या महोत्सवाचे सौधर्म इंद्राणी होण्याचा मान सौ सुरागी व आदित्य आप्पासाहेब तेरदाळे यांना मिळाला आहे. तीर्थंकर माता-पिता माणिक व महावीर रामू बोरगावे, धनपती कुबेर प्रीती व स्वप्नील सुभाष बलवान,सुवर्ण सौभाग्यवती अमृता व सतीश सुभाष बदनीकाई, महायज्ञनायक सुरेखा व शांतिनाथ शामगोंडा पाटील, ईशान्य इंद्र इंद्राणी वंदना व राजेंद्र भूपाल खंडेराजुरी, सानतकुमार इंद्र इंद्राणी मयुरा व प्रमोद कुमार तेरदाळे आणि महेंद्र इंद्र इंद्राणी सुनीता व रमेश भूपाल सिदनाळे यांना मिळाला आहे. महोत्सव काळात विविध वक्त्यांची भाषणे आणि प्रवचन त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रम आणि मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.
यासाठी दिगंबर जैन बोर्डिंग च्या आवारामध्ये भव्य मंडप उभारण्यात आला असून येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी भोजन कक्षही उभारण्यात आले आहे. पत्रकार परिषदेस महोत्सव समितीचे सेक्रेटरी बाबासो हुपरे, नरेंद्र केटकाळे, पार्श्वनाथ पाटील यांच्यासह समिती सदस्य दिगंबर जैन बोर्डिंग, वीर सेवा दल आणि वीर महिला मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
आवाडे दादांचा ‘संस्काररत्न’ ने सन्मान
धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, क्रिडा, संस्कृतिक राजकीय अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे दादा यांचा सकल जैन समाजाच्या वतीने ‘संस्कार रत्न ‘ या पदवीने सन्मान करण्यात येणार आहे. हा सोहळा रविवार २० एप्रिल रोजी दुपारी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800