प्रतिबंधात्मक कारवाई जिल्हा सत्र न्यायालयाकडून रद्द:अभिषेक पाटील यांना दिलासा
इचलकरंजी–
इचलकरंजी येथील सामाजिक कार्यकर्ते अभिषेक पाटील यांच्यावर विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा अपर पोलीस अधीक्षकांनी केलेली प्रतिबंधात्मक कारवाई जिल्हा सत्र न्यायालयाने रद्द केली आहे. या निर्णयामुळे पाटील यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
अभिषेक पाटील यांच्यावर गावभाग व शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एकूण सात गुन्हे दाखल आहेत. या पार्श्वभूमीवर गावभाग पोलीस ठाण्याकडून त्यांना “सराईत गुन्हेगार” घोषित करत प्रतिबंधात्मक कारवाईचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाला मान्यता देत विशेष कार्यकारी दंडाधिकार्यांनी पाटील यांच्यावर तीन वर्षांची प्रतिबंधात्मक कारवाई करत चांगल्या वर्तवणुकीसाठी ३ वर्षांचा बंधपत्र व १ लाख रुपयांच्या लायक जामीनदारासह आदेश दिले होते.
मात्र, पाटील यांनी या कारवाईविरोधात जिल्हा सत्र न्यायालयात क्रिमिनल रिविजन दाखल केला होता. या प्रकरणात पाटील यांच्या वतीने अॅड. मेहबूब बाणदार यांनी युक्तिवाद केला. न्यायालयाने पाटील यांच्यावर दाखल गुन्हे हे आंदोलनाशी संबंधित असून, त्यांना “सराईत गुन्हेगार” किंवा “समाजासाठी धोकादायक” म्हणणे अनुचित असल्याचे नमूद करत विशेष कार्यकारी दंडाधिकार्यांनी दिलेले आदेश रद्द केले.
जिल्हा सत्र न्यायाधीश एम. आर.नेरलेकर यांनी हा ऐतिहासिक निर्णय दिला असून, या निर्णयाची माहिती अभिषेक पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800