कलानगर महागणपती येथे “गजमहल” साकारणार – भव्य कलाकृतीकडे भाविकांचे लक्ष
इचलकरंजी :
कलानगर महागणपती मंडळाचा ४८ वा गणेशोत्सव यावर्षी भव्यदिव्य कलाकृतीने सजणार आहे. मंडळाने यंदा “गजमहल” ही अनोखी संकल्पना उभारण्याचे ठरवले असून त्यासाठी तब्बल सहा हजार चौरस फुटांमध्ये ३५ फूट उंच देखावा उभारण्यात येत आहे.
या गजमहलामध्ये वीस बाय चाळीस फुटांचा जलकुंभ तयार केला असून त्यात राजहंस पक्षी सोडून नैसर्गिक दृश्य साकारले जाणार आहे. जमिनीपासून आठ फूट उंचीवर साकारलेल्या या कलाकृतीत १,००० हत्तींची मांडणी केली जाणार असून त्यामध्ये एका फूटापासून अडीच फूटापर्यंत उंचीचे हत्ती असतील. प्रवेशद्वारावर तब्बल साडेबारा फुटांचे दोन भव्य हत्ती भाविकांचे स्वागत करतील.
मंडळाने २०२० पासून यांत्रिक देखाव्यांना फाटा देत ध्वनी व प्रदूषणमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा कायम ठेवली आहे. या कलाकृतीसाठी गेली तीन महिने जवळपास २०० कार्यकर्ते अथक परिश्रम घेत असून दररोज ३० कार्यकर्त्यांचे योगदान आहे
बुधवार, दि. २७ ऑगस्ट २०२५ रोजी सायं. ६ वाजता श्री महागणपती प्राणप्रतिष्ठापना होऊन उत्सवाची सुरुवात होईल. त्यानंतर रोज सकाळ-संध्याकाळ शोडशोपचार पूजा, पंचोपचार पूजा, मंगलआरती व मंत्रपुष्पांजली होणार आहे.
गुरुवार, दि. २८ ऑगस्ट रोजी ऋषी पंचमी निमित्त सामूहिक महिला गणपती अथर्वशीर्ष पठण होणार असून यामध्ये तब्बल १००१ महिला भगिनींचा सहभाग असेल. शनिवार, दि. ३० ऑगस्ट रोजी श्री गणेशमंत्राने सहस्त्रदुर्वार्चन पार पडेल. रविवारी, दि. ३१ ऑगस्टला गौरी आवाहन व अथर्वशीर्ष सहस्त्रावर्तन पूजन होईल. सोमवार, दि. १ सप्टेंबरला श्री महागणपतीस शहाळ्यांची महापूजा, तर मंगळवार, दि. २ सप्टेंबर रोजी अष्ट फलाहार महानैवेद्य व श्री गणेशयाग पार पडणार आहे.
बुधवार, दि. ३ सप्टेंबर रोजी वारकरी भजन, सूर्यपुष्पार्चना तसेच रात्री शुद्ध शास्त्रीय रागसाधना होणार असून त्यासाठी मुंबईचे ख्यातनाम गायक श्री. यज्ञेश रायकर सादरीकरण करणार आहेत. गुरुवार, दि. ४ सप्टेंबर रोजी सत्यनारायण पूजा, मंत्रजागर (२१ ब्रह्मवृंदांच्या सहभागाने) तसेच राजभोग नैवेद्य (बुंदीमोदक) होईल. याच दिवशी वाद्यवंदना व रात्री केसरी ढोलताशा पथकाची वादन सेवा भाविकांसाठी खुली राहील.
शुक्रवार, दि. ५ सप्टेंबर रोजी श्री महागणपती पालखी सोहळा कलानगर परिसरातून दुपारी ४ वाजता निघणार असून त्यानंतर पुष्पमहोत्सव व रात्री राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त गायक पं. आनंद भाटे (आनंदगंधर्व) यांचा स्वराभिषेक रंगणार आहे. शनिवार, दि. ६ सप्टेंबर रोजी सकाळी उत्तरांग पूजा व त्यानंतर विसर्जन मिरवणूक शिवतांडव ढोल-ताशा व ध्वज पथक, सांगली यांच्या वादनाने संपन्न होईल.
या सर्व कार्यक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाचे अध्यक्ष सचिन तोडकर यांच्या नेतृत्वाखाली प्रभागातील शेकडो कार्यकर्ते काम करत आहेत. सुनील तोडकर,रमाकांत वाळवेकर,प्रशांत सपाटे यांचे मार्गदर्शनाने अभिषेक वाळवेकर, रोहन सपाटे, पंकज डंबाळ यांनी देखाव्याच्या कलाकृती व नियोजनात विशेष परिश्रम घेतले आहेत.
मुस्ताक पैलवान,चंद्रकांत सपाटे,उदय म्हेतर,समीर तारळेकर,रोहित तोडकर,तुषार म्हेतर यांच्यासह मंडळातील जवळपास २०० कार्यकर्त्यांनी गेल्या तीन महिन्यांपासून दिवस-रात्र श्रम देऊन गजमहल उभारला आहे.
या सर्व कार्यक्रमांची तयारी मोठ्या दिमाखात सुरू असून भाविकांसाठी दररोज धार्मिक वातावरणात विविध उपक्रम होणार आहेत. मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सांगली,सातारा,कोल्हापूर, कर्नाटकात याबाबत प्रसिद्धी केली असून भाविकांनी उत्सवामध्ये सहभागी होऊन महागणपतीचे आशीर्वाद घेण्याचे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
लाखो भाविक गणेशोत्सवात दर्शनासाठी व कलाकृती पाहण्यासाठी भेट देत असतात त्यामुळे त्यामुळे महापालिका व पोलीस प्रशासनाने सहकार्य करावे असे आवाहन सुनील तोडकर यांनी केले
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







