इचलकरंजी महानगरपालिका विसर्जनासाठी सज्ज
अनंत चतुर्दशी निमित्त सार्वजनिक गणेश मूर्ती विसर्जनासाठी शहापूर खणीवर व्यवस्था
इचलकरंजी :
अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्ती विसर्जनासाठी इचलकरंजी महानगरपालिका प्रशासनाने व्यापक नियोजन केले असून संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे. आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहापूर खण येथे मूर्ती विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
यंदा शहापूर हायस्कूल मागील विसर्जन स्थळ, ओपन जीमजवळ व बालाजी नगर (पद्मा पॅलेस समोर) या तीन ठिकाणी अद्ययावत क्रेनच्या सुविधेसह विसर्जनाची सोय करण्यात आली आहे. विसर्जनाच्या दिवशी आरोग्य विभाग, घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छता निरीक्षक, प्रभाग अधिकारी, अतिक्रमण व आपत्ती व्यवस्थापन विभागांसह जवळपास २०० अधिकारी-कर्मचारी कार्यरत राहणार आहेत.
याशिवाय आधार रेस्क्यू फोर्स, पोलिस बॉईज इचलकरंजी, वीर रेस्क्यू फोर्स, पट्टिचे पोहणारे स्वयंसेवक, २ यांत्रिक बोटी, ४ क्रेन, १ अग्निशमन वाहन, ४ रुग्णवाहिका व वैद्यकीय पथके (इचलकरंजी महानगरपालिका, इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय, एन.यु. एच.एम., सेवाभारती रुग्णालय, क.बा. आवाडे चॅरिटेबल ट्रस्ट) या सर्वांची मदत घेण्यात आली आहे.
महानगरपालिकेच्या या संपूर्ण यंत्रणेवर आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील, अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, उपायुक्त नंदू परळकर, अशोक कुंभार, राहुल मर्ढेकर व विद्या कदम यांचे नियंत्रण राहणार आहे.
शहरातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी पर्यावरणपूरक उत्सव साजरा करत शहापूर खण येथेच आपल्या मूर्तींचे विसर्जन करावे, असे आवाहन आयुक्त पल्लवी पाटील यांनी केले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








