इचलकरंजीत पर्यावरण पूरक गणेशोत्सवाची व्यापकता वाढवण्याची गरज, लोकप्रतिनिधींनी शासनाचे आदेश पाळण्याची आवश्यकता
इचलकरंजी:
इचलकरंजी महानगरपालिकेच्या आवाहनास शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ठीकठाक प्रतिसाद दिला असून यावर्षी अनंत चतुर्दशी दिवशी एकूण ५०० गणेश मूर्तींचे पर्यावरण पूरक विसर्जन करण्यात आले. शहापूर खण,ओपन जीमजवळ तसेच बालाजी नगर पद्मा पॅलेस समोर महापालिकेने क्रेन व बोटींच्या साहाय्याने विसर्जनाची सोय केली होती.
महानगरपालिकेने राबविलेल्या या उपक्रमाचे आमदार डॉ. राहुल आवाडे व जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी प्रत्यक्ष भेट दिली. आयुक्त पल्लवी पाटील यांनी पर्यावरण पूरक उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व मंडळांचे मनःपूर्वक आभार मानले.
१६०० पैकी ५०० मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.शनिवारी झालेल्या या विसर्जनात १५२ सार्वजनिक गणेश मूर्ती, शहापूर खण येथे ३०३ मूर्ती व नदी घाटावरील कृत्रिम तलावात ४५ घरगुती गणेश मूर्तींचा समावेश होता. शहरातील सुमारे १६०० नोंदणीकृत मंडळांपैकी फक्त ५०० मंडळांनीच पर्यावरणपूरक विसर्जनाचा स्वीकार केला. त्यामुळे या उपक्रमाची व्यापकता वाढवण्याची नितांत गरज असल्याचे चित्र समोर आले आहे.
या विसर्जनासाठी महापालिकेचे सहा आयुक्त विजय राजापुरे, आरोग्य अधिकारी डॉ. सुनिलदत संगेवार, शहर अभियंता महेंद्र क्षिरसागर, कार्यकारी अभियंता अभय शिरोलीकर आदींसह २०० अधिकारी व कर्मचारी सज्ज होते.आधार रेस्क्यू फोर्स, स्पेशल कमांडो फोर्स,वीर रेस्क्यू फोर्स,स्थानिक पोहणारे स्वयंसेवक,३ क्रेन,२ बोटी,१ अग्निशमन वाहन व ४ रुग्णवाहिका या साधनसामग्रीचा उपयोग करून व्यवस्था करण्यात आली. संपूर्ण परिस्थितीवर आयुक्त पल्लवी पाटील, उपायुक्त नंदू परळकर व उपायुक्त अशोक कुंभार यांनी थेट नियंत्रण ठेवले.
लोकप्रतिनिधीची कणखर भूमिका आवश्यक.
कोल्हापूर शहरात पंचगंगा नदीत मूर्ती विसर्जनास बंदी असून तेथील लोकप्रतिनिधी पर्यावरणपूरक उपक्रमांना प्राधान्य देतात. मात्र इचलकरंजीत मात्र परिस्थिती वेगळी आहे. डॉल्बीबाबत शासनाने स्पष्ट निर्बंध घातलेले असतानाही काही लोकप्रतिनिधी मंडळांच्या लाडासाठी पोलिसांच्या आयोजित बैठकीत डॉल्बी वाजवण्याला थेट पाठिंबा देतात. परिणामी शहरातील नागरिकांना ध्वनीप्रदूषणाचा त्रास सहन करावा लागतो. एकीकडे शासन प्रदूषण रोखण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे लोकप्रतिनिधींची ही भूमिका संशयास्पद ठरत आहे.
महापालिका पंचगंगेतील विसर्जन रोखण्यात अपयशी.
महानगरपालिका शासनाच्या आदेशानुसार पर्यावरण पूरक उपक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करते. मात्र नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात खरंच कठोर कारवाई करणार का? पंचगंगेत विसर्जन रोखण्यासाठी महापालिकेने काय प्रयत्न केले?लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली प्रशासनाने बोटचेपी भूमिका का घेतली हा प्रश्न आता शहरवासीयांसमोर उभा राहिला आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








