साहित्य आणि समाज यांना एकमेकांपासून वेगळे करता येत नाही -प्रा. डॉ. सुभाष जाधव यांचे मत
इचलकरंजी ता.२७ पाण्याच्या लाटेपासून पाणी वेगळे काढता येत नाही, फुलाला सुगंधापासून दूर करता येत नाही तसेच समाज आणि साहित्य यांना एकमेकांपासून वेगळे करता येत नाही.समाजातून साहित्य निर्माण होते आणि साहित्यात समाजबांधणी करण्याची क्षमता असते. भाषानिर्मिती झाल्यानंतर साहित्यनिर्मिती विकसित होत गेली. अभिजात भाषेचा दर्जा मिळालेल्या मराठी भाषेला दोन हजारावर वर्षाचा इतिहास आहे.या काळातील राजकीय , सामाजिक, आर्थिक,सांस्कृतिक अशा सर्व घडामोडींचे व समाजजीवनाचे चित्रण मराठी साहित्यात दिसून येते. साहित्य आणि समाज यांचा अनुबंध परस्परपूरक आहे,असे मत मराठीचे गाढे अभ्यासक प्रो.डॉ. सुभाष जाधव यांनी व्यक्त केले. ते सुवर्ण महोत्सवी संमेलन स्मृती जागर कार्यक्रमाचे नववे पुष्प गुंफताना “साहित्य आणि समाज “या विषयावर बोलत होते.प्रा.रोहित शिंगे यांनी प्रास्ताविक केले व पाहुण्यांचा परिचय करून दिला.कवयित्री वैशाली नायकवडी यांनी स्वागत केले.
Advt
प्रा. सुभाष जाधव म्हणाले, साहित्य केवळ मनोरंजन करत नाही तर समाज परिवर्तनही घडवत असते., महदंबा, महानुभाव संप्रदाय, संत साहित्यापासून आजच्या साहित्यातून त्याचे प्रतिबिंब दिसून येते. साहित्य आणि समाज यांचे परस्पर संबंध अनेक साहित्यिक व साहित्यकृती यांचे दाखले देत प्रा. जाधव यांनी या विषयाची अभ्यासपूर्ण मांडणी केली.
दिलीप शेंडे यांच्या स्वानंदी निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमास दिलीप शेंडे, दीपश्री शेंडे,प्रसाद कुलकर्णी, ॲड. माधुरी काजवे, स्वाती गोंदकर, मुकुंद गोंदकर ,माधव देवधर, विजय यादव, प्रा.व्ही.बी.पाटील, प्रा. एम.एम. कांबळे आदी उपस्थित होते.
सुभाष जाधव सर आपले मनोगत व्यक्त करताना
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







